अहिल्यानगर : शहरातील झेंडीगेट परिसरात घर व घराच्या आवारात पत्र्याचे शेड टाकून उभारण्यात आलेले ५ अवैध कत्तलखान्यांच्या बांधकामांवर आज, गुरूवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली. पत्र्याचे मोठे व पक्के शेड करून केलेली बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार अभियंता सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

दोन दिवसांपूर्वी कोठला परिसरातील छत्रपती संभाजीनगर रस्त्यालगत व रस्त्यावर गोवंश जनावरांचे अवशेष आढळून आले होते. याविरोधात आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रमसिंह पाचपुते व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन रास्तारोको आंदोलन केले होते. या आंदोलनात आमदार जगताप यांनी महापालिकेला कत्तलखान्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्त डांगे व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने झेंडीगेट परिसरात पाहणी केली होती.

पोलिसांकडून कारवाई झालेल्या कत्तलखान्यांच्या बांधकामाचा अहवाल महापालिकेकडे यापूर्वीच दाखल करण्यात आला होता. त्यातील ५ पत्र्याच्या शेडची कत्तलखान्याची बांधकामे गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वीही झेंडीगेट भागातील दोन कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले होते.

दरम्यान, याच परिसरात असलेल्या मनापच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापरही कत्तलखान्यासाठी केला जात असल्याचे आढळल्याने हे स्वच्छतागृह बंद करण्यात आल्याचे अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले. कारवाईवेळी अतिरिक्त अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक शिरीष वमने, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, आनंद कोकरे, शीघ्र कृती दलाचे पथक यासह कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्याचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान कोठला भागातील रस्त्यावर गोमांस टाकणाऱ्याचा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने शोध घेऊन त्याला अटक केली आहे. तरबेज आबीद कुरेशी (वय २४, रा. व्यापारी मोहल्ला, अहिल्यानगर) याला अटक केली आहे. त्याने गोमांस रस्त्यावर टाकण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचे तपासात आढळल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबड्डी यांनी सांगितले. गुन्ह्यात वापरलेली मोपेडही पोलिसांनी हस्तगत केली आहे. तरबेज कुरेशी याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार दिपक घाटकर, सुनिल पवार, गणेश धोत्रे, शाहीद शेख, फुरखान शेख, भिमराज खर्से, सतिष भवर, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे, छाया माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.