सरकारला लकवा लागला की काय, हे कळत नाही, या राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याने उठलेले वादळ शमत नाही तोच काकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लकवा अधिकच वाढल्याचा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उद्देशून शुक्रवारी मारला. चार राज्यांचा निकाल ताजा असतानाच भले तर काँग्रेसने राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा लढवाव्या, असा प्रेमळ सल्लाही दिला.
‘सुयोग’ या पत्रकारांच्या निवासस्थानी अनौपचारिक गप्पांत पवार यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. हाच धागा पकडीत पवार यांना छेडले असता हा लकवा अधिकच वाढल्याचे वक्तव्य ते पटकन करून बसले. त्याच्या परिणामांची जाणीव होताच लगेचच त्यांनी या विषयाला बगल दिली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल टिप्पण्णी करताना राज्य महिला आयोग, सहकार निवडणूक प्राधिकरण याचे निर्णय घेण्यापासून त्यांना कोणी अडविले आहे. अजूनही अनेक निर्णय प्रलंबित असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर लकव्याची कोटी केली. पक्षाने आदेश दिल्यास आपणही लोकसभेची निवडणूक लढवू, असे ते म्हणाले. पवार यांनी सांगितले की, अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबाबत सरकारवर दबाव वाढत आहे. मात्र, रस्ता, नाले याशिवाय आरक्षित जागेवरील बांधकामे अधिकृत करता येणार नाहीत.
मुंबईतील विविध कंपन्यांच्या वीजदरात समानता आणताना सरकारवर आर्थिक भार पडला असता म्हणून तूर्तास ही व्यवस्था तशीच ठेवावी लागत असल्याचेही ते म्हणाले.

चव्हाणांचीही टोलेबाजी
अनेक घोटाळ्यांचा फटका चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बसल्याचे मान्य करतानाच आदर्श आणि सिंचन घोटाळ्यांमुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला काहीसा फटका बसू शकतो, असे सूचक उद्गार काढीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी नागपुरात राष्ट्रवादीबरोबरच आपले पूर्वसुरी अशोक चव्हाण यांनाही लक्ष्य केले. अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.