सातारा : संगीत महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुरांच्या संस्कृतीची जपणूक करणे हे आमच्या सरकारचे स्पष्ट धोरण आहे. ही परंपरा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. औंध संगीत महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील संस्कृतीचे संवर्धनच होत असते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यातील औंध येथे सांगितले.

८५ व्या औंध संगीत महोत्सवात ‘रियाज’ या स्मरणिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, उदयसिंह पाटील, अनिल देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पंडित अरुण कशाळकर, पं. उल्हास कशाळकर, सुरेश तळवळकर, श्रावण हर्डीकर, याशनी नागराजन, संतोष रोकडे, बाळासाहेब सोळसकर, पल्लवी जोशी, अपूर्वा गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यातील वारसा स्थळांचं सौंदर्य जपण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. प्रशासनाला तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. गौरवशाली सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आम्ही सगळेजण वचनबद्ध आहोत. संगीत महोत्सव सुद्धा समृद्ध परंपरेचा एक भाग आहे. शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानला संगीत सेवा निरंतर चालू ठेवण्यासाठी निवासी गुरुकुल निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू, अशी ग्वाहीही पवार यांनी दिली.

औंध संस्थानाची ओळख केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातच नाही तर कलात्मक दृष्टिकोनातून एक आदर्श संस्था म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये परिचित आहे. संगीत, साहित्य, नाट्य, चित्रकला आणि नृत्य या सांस्कृतिक क्षेत्रांना औंध संस्थांनने राजाश्रय दिला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहित्य कला संगीत संस्कृती क्रीडा ह्या सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना मदत करण्याची शिकवण दिली आहे. तोच विचार माझ्या राजकीय जीवनामध्ये ठेवून या क्षेत्रातील लोकांना मदत करीत आहे.

पंडित अनंत जोशी आणि त्यांचे पुत्र पंडित गजानन बुवा जोशी यांनी संगीत महोत्सवाचा पाया घातला आहे. शिवानंद संगीत प्रतिष्ठान हा वारसा पुढे चालवत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. संगीत महोत्सव सभागृहावर पत्रा असल्याने पावसाच्या सरींचा आवाजाने अडथळा निर्माण होतो, अशी खंत पल्लवी जोशी, अपूर्वा गोखले यांनी व्यक्त केली होती. गायत्रीदेवी यांनी देखील नूतनीकरणासाठी आग्रह धरला होता. वेळ थोडा असताना प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवून नूतनीकरणाचे काम पूर्ण केले आहे. अजून यामध्ये काही कमतरता भासत असेल तर आवर्जून सांगा, त्यामध्ये आम्ही सगळेजण लक्ष घालून मदत करू, असे त्यांनी सांगितले.