अलिबाग : माथेरानला पर्यटनासाठी आलेल्या दोघांचा कर्जत तालुक्यातील पाली भूतवली धरणात बुडून मृत्यू झाला आहे. इब्राहिम आझीज खान आणि खलील अहमद शेख अशी या दोघांची नावे आहेत. दोघेही मुंबईतील गोवंडी येथील रहिवासी आहेत.

गोवंडी येथील इब्राहिम खान, खालील शेख आणि हितेश कांदू हे तीन मित्र पाळीव कुत्र्यासह पर्यटनासाठी शनिवारी माथेरान मध्ये आले होते. रविवारी सकाळी घरी परत जात असताना, हे तिघं पाली भूतवली धरणा जवळ पोहण्यासाठी थांबले. इब्राहिम खान आणि खालील शेख हे दोघे धरणात पोहण्यासाठी उतरले. तर हितेश कांदू हा किनाऱ्यावर राहून या दोघांचे चित्रीकरण करत होता.

अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. हितेशने तातडीने आसपासच्या नागरिकांना मदतीसाठी बोलावले. नेरळ पोलिसांनी स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने दोघांचा शोध सुरू केला. बचाव पथकांनी दोघांनाही बाहेर काढले मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.