अलिबाग : जून महिन्याची चाहू लागली तरी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. राज्‍य शासनाच्‍या सुधारीत संचमान्‍यता धोरणाला राज्‍यातील प्राथमिक शिक्षकांचा विरोध असताना, शासनाने संच मान्‍यता निश्चित करण्‍यापूर्वीच शिक्षकांच्‍या बदल्‍यांसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र संच मान्‍यतेपूर्वीच बदल्‍या झाल्‍या तर शिक्षकांना पुन्‍हा बदल्‍यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. जुन्या पध्दतीने संचमान्यता निश्चित करावी नंतरच बदल्या कराव्यात अशई मागणी शिक्षक परिषदेनी केली आहे.

राज्‍य सरकारचा शालेय शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभागात समन्‍वय नसल्‍याचे दिसून येत आहे. याचा फटका शिक्षकांना बसणार आहे. जर आता एखाद्या शिक्षकाची विशिष्‍ट शाळेवर बदली झाली आणि नंतर होणारया संचमान्‍यतेत तो शिक्षक संबंधित शाळेवर अतिरिक्‍त ठरला तर त्‍याची पुन्‍हा बदली होईल. यामध्‍ये त्‍या शिक्षकासह त्‍याच्‍या कुटुंबाची ससेहोलपट होणार असल्‍याचे शिक्षकांचे म्‍हणणे आहे.

शिक्षक संच मान्‍यता हा विषय शालेय शिक्षण विभागाकडे येतो तर शिक्षकांच्‍या बदल्‍यांचा विषय ग्रामविकास विभागाकडे येतो. दोन्‍ही विभागांमध्‍ये समन्‍वय नसल्‍याने ही समस्‍या उदभवली आहे. मुळातच मे महिन्‍यात शिक्षकांच्‍या बदल्‍या होणे अपेक्षित होते परंतु संचमान्‍यतेअभावी अद्याप बदल्‍या रखडल्‍या आहेत. शाळा सुरू व्‍हायला अवघे काही दिवस उरले आहेत अशावेळी बदलीपात्र शिक्षकांच्‍या पाल्‍यांचे शाळेतील प्रवेश देखील रखडले आहेत. आपल्‍या पाल्‍याला एखाद्या शाळेत प्रवेश घेतला आणि बदली दुसरीकडे झाली तर काय करायचे असा प्रश्‍न शिक्षकांना सतावतो आहे.

15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार झालेल्या बदलाच्या अनुषंगाने कार्यवाही झाली तर एखाद्या शाळेत इयता सहावी ते आठवी चे वर्ग मिळून 20 पेक्षा कमी पटसंख्या असेल तर एकही शिक्षक मान्य होत नाही. परिणामी अनेक पदवीधर शिक्षक रिक्त ठरण्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे तसेच पूर्वी विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकसंख्या निर्धारित होती नव्या निकषानुसार विद्यार्थी संख्या वाढवण्यात आली आहे परिणामी अनेक शाळांना अपेक्षेपेक्षा कमी शिक्षक उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्‍यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.त्यामुळे जुन्या पध्दतीने संच मान्यता निश्चित करून शिक्षकांच्या बदल्या कराव्यात अशी मागणी शिक्षक परिषदेनी केली आहे.

नव्या संचमान्यतेला विरोध का.?

शासनाच्‍या या धोरणामुळे सहावी ते आठवीतील राज्यभरातील शिक्षक अतिरिक्त ठरतील तसेच ग्रामीण भागातील सहावी ते आठवीचे वर्ग बंद पडण्याची शक्यता आहे . उच्च प्राथमिक शाळेत वर्ग सहा ते आठ तिन्ही वर्ग असतील तर तीन शिक्षक मान्य होण्यासाठी 78 पटसंख्या असणे आवश्यक आहे या अगोदरची 61 पटसंख्या असल्यास तीन तीन शिक्षक मान्य होत होते ज्या शाळेत वर्ग सहावी ते सातवी किंवा सहावी ते आठवी असे एकूण 20 पेक्षा कमी विद्यार्थी तेथे एक शिक्षक मान्य करण्यात आले आहेत त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखले घेऊन दुसऱ्या शाळेमध्ये जावे लागण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागातील कमी पटाच्‍या शाळा बंद करण्‍याचा घाट शासनाने घातला आहे. या नवीन संच मान्‍यतेमुळे त्‍याला अधिक पुष्‍टी मिळते आहे. या धोरणामुळे गोरगरीब विद्यार्थ्‍यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. महत्‍वाचे म्‍हणजे आधी जुन्‍या पदधतीनुसार संचमान्‍यता निश्चित करावी नंतरच बदली प्रक्रियेला सुरुवात करावी. अन्‍यथा त्‍याचा त्रास शिक्षकांना होईल राजेश सुर्वे, राज्‍याध्‍यक्ष महाराष्‍ट्र राज्‍य शिक्षक परिषद (प्राथमिक)