Raigad Khalapur Irshalgad Irshalwadi Landslide : दरड दुर्घटनेनंतर इर्शाळवाडीवर शोककळा पसरली आहे. बेपत्ता असलेल्या कुटुंबीयांचा शोध लागत नसल्याने आणि काहीच माहिती मिळत नसल्याने या दुर्घटनेत बचावलेल्यांचा आणि नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. दुर्घटनेत बचावलेल्या महिला धाय मोकलून रडत आहेत, तर तरुण मुले पाणावलेल्या डोळ्यांनी हताशपणे जिवाभावाची माणसे बचावलीत का याकडे आस लावून बसले आहेत. दरम्यान या वाडीच्य भौगोलिक परिस्थितीमुळे तिथे अत्याधुनिक यंत्रणा पोहोचणे अवघड असल्याने मनुष्यबळावरच बचाव आणि मदतकार्य अवलंबून आहे. या मनुष्यबळाला आता श्वानपथकांची मदत मिळाली आहे. एनडीआरएफच्या पथकाने तीन श्वानांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
हेही वाचा >> Raigad Landslide : २२८ जणांच्या वस्तीतून फक्त १०९ जण सापडले, बाकीचे कुठे आहेत? एकनाथ शिंदे म्हणाले…
दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रायगड पूरस्थितीशी झुंजत असताना खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीला बुधवारी मध्यरात्री डोंगरसमाधी मिळाली. इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या या वाडीवर दरड कोसळून आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन आज विधानसभेत दिली. ४८ कुटुंबांच्या या गावात २२८ नागरिक राहत होते. परंतु, आतापर्यंत फक्त १०९ नागरिकांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित नागरिकांना शोधण्याचं मोठं आव्हान बचावकार्य पथकाकडे आहे.
“या ठिकाणी दरड कोसळली असल्याची माहिती मिळाली. बचावकार्यासाठी मोठ्या अडचणी आहेत. आमच्या पथकाने बचावकार्य सुरू केलं. फिरो नावाच्या श्वानाने दोन मृतदेह शोधून काढले. मारिया, फिरो आणि जॉकी असे तीन श्वान बचावकार्यासाठी तैनात करण्यात आले असून यापैकी दोन नर आणि एक मादी श्वान आहे”, अशी माहिती एनडीआरएफमधील कर्मचाऱ्याने दिली.
निसरड्या रस्त्यामुळे अत्याधुनिक यंत्रणा पोहोचल्या नाहीत
इर्शाळवाडीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने यंत्रसामुग्री नेणे अशक्य बनले. त्यामळे मनुष्यबळाच्या मदतीने दिवसभर बचावकार्य सुरू होते. त्यासाठी सरकारने दोन हेलिकॉप्टर तैनात ठेवली होती. मात्र, दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने त्यांचा वापर करता आला नाही.
१९ जुलैच्या रात्री ही घटना घडली. लोक झोपण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. मात्र, यावेळी आश्रमशाळेतील मुलं खेळत होती. त्यांना काहीतरी कोसळण्याचा मोठा आवाज आला. त्यांच्यामुळे काही लोक सतर्क झाले आणि त्यांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. परंतु, ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू शकली नाही ते ढिगाऱ्याखाली अडकले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आश्रमशाळेत मुलं खेळत होती, त्यांना आवाज आल्यावर त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं. यामुळे २०-२५ लोक वाचू शकले. काही लोक मासेमारीसाठी गेले होते, काही लोक भातशेतीसाठी गेले होते. काही लोक बाहेर असण्याची शक्यता आहे.”
हेही वाचा >> दरडीमुळे गाव उद्ध्वस्त; इर्शाळवाडीतील नागरिकांच्या पुनर्वसनाचा मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला प्लॅन, सभागृहात म्हणाले…
इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू
“१०० वर्षांपासून राहणारे ते रहिवासी होते. दरडप्रवण क्षेत्राच्या यादीतही त्यांचं नाव नव्हतं. तरीही तिथे इर्शाळगडावरील दरड कोसळली. सुरुवातीला अशी माहिती मिळाली होती की ४८ घरांवर तो डोंगर पडला. परंतु, आम्ही गेलो तेव्हा १७-१८ घरांवर मलबा होता. कालपर्यंत १०९ लोकांची ओळख पटली आहे. त्यापैकी २० जणांचा मृत्यू, तर आठ जण जखमी आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
