कुकडी कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यामधील काही भागांमध्ये पाणी मिळत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कर्जत श्रीगोंदा रस्त्यावर आढळगाव या गावामध्ये एसटी स्टँड परिसरामध्ये चार तास उन्हामध्ये रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आंदोलनामध्ये सरपंच शिवप्रसाद उबाळे, शरद जमदाडे, देवराव वाकडे, दत्तात्रेय चव्हाण, अमोल डाळिंबे, हनुमंत गिरमकर, भाऊसाहेब डोके, माऊली काळे, महादेव लाळगे, राजू बोटरे, अशोक ढवळे, रघुनाथ सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

कुकडीचे आवर्तन श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुरू झाले आहे. उन्हाळी पिकांसाठी सध्या पाण्याची आवश्यकता आहे. आढळगाव परिसरातील कुकडी कालवा चारी क्रमांक डी वाय १२,१३,१४ व देवनदी घोडेगाव तलाव या परिसरातील शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी मिळत नाही, यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी मागील वीस वर्षांपासून जतन केलेल्या फळबागा उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.

उकडीचे आवर्तन १६ फेब्रुवारीपासून तेल टू हेड असे सुरू झाले आहे. सुरुवातीला करमाळा व त्यानंतर कर्जत तालुक्याला कुकडीचे पाणी शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. आढळगाव परिसरातील या लाभधारक शेतकऱ्यांना मात्र पाणी अद्याप मिळाले नाही, यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी श्रीगोंदा कर्जत रस्त्यावर आढळगाव बसस्थानक परिसरामध्ये सुमारे चार तास उन्हामध्ये आंदोलन केले.

यावेळी बोलताना सरपंच शिवप्रसाद उबाळे म्हणाले की, आढळगाव परिसरातील या तीनही चारी अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांवर व देवनदी घोडेगाव तलाव या परिसरावर सातत्याने कुकडीच्या पाणी मिळण्यासाठी अन्याय होत आहे. यामुळे या परिसरातील शेती व शेतकरी संकटात सापडले आहेत. मंगळवारी (ता. १८) कुकडी पाटबंधारे विभागाच्या या कार्यालयामध्ये जाऊन निवेदन दिले, त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत चर्चाही झाली. मात्र, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, म्हणून आज या परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे.

यामुळे पाणी घेतल्याशिवाय आता शेतकरी माघार घेणार नाहीत, असे उबाळे यावेळी म्हणाले. यावेळी शरद जमदाडे,  देवराव वाकडे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकारी व आंदोलक शेतकरी यांच्यामध्ये आंदोलनाच्या ठिकाणीच चर्चा झाली. शेतकरी पाणी आजच सोडावे या मागणीवर ठाम होते. अखेर कार्यकारी अभियंता घोरपडे यांनी उद्यापासून या परिसराला कुकडीचे आवर्तन देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Angry farmers blocked road for four hours to get water in summer in shrigonda taluka zws