अहिल्यानगर : जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आतापर्यंत १९२ गावांतून बाधित जनावरे आढळली आहेत. ही गावांचा ५ किमीचा परिसर बाधित क्षेत्र, तर १० किमी परिसर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी नियंत्रित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जाहीर केला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८८८ जनावरे बाधित झाली आहेत, तर ३५ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. या गावांतून जनावरांची वाहतूक, शर्यती, प्रदर्शन भरवण्यास, खरेदी-विक्रीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाची माहिती दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ८८८ जनावरे बाधित झाली, त्यातील ५१४ जनावरे लंपीमुक्त झाली, तर ३७४ जनावरांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ८ अत्यवस्थ आहेत व ३५ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. बाधित क्षेत्रासाठी पशुधनाची वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे, तर बाधित भागातील जनावरे निरोगी भागात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे.

पशुपालकांनी बाधित परिसरात स्वच्छता व निर्जंतुकीकरण फवारणी करणे, भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण व बाधित पशुधनापासून त्यांना वेगळे ठेवण्याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. पशुधनाच्या ऑनलाइन पद्धतीने खरेदी-विक्रीस प्रतिबंध करण्यात आला आहे. बाधित जनावरांच्या संपर्कातील वैरण, गवत, अन्य साहित्य, तसेच प्राण्यांचे शव, कातडी, कोणताही भाग, प्राण्यांचे उत्पादन याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची सूचना करण्यात आली आहे. प्राण्यांचा बाजार भरवण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. शर्यती, जत्रा, प्रदर्शन यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे. याचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

ही जबाबदारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण पशुसंवर्धन विभागाने तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बाधित गावांची संख्या

तालुकानिहाय बाधित व नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या गावांची संख्या पुढीलप्रमाणे- अहिल्यानगर २, अकोले ४, जामखेड ४, कर्जत २३, कोपरगाव ११, नेवासी ३६, पारनेर १८, पाथर्डी २, राहता २५, राहुरी १३, संगमनेर ३१, शेवगाव २, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १९. या गावच्या १० किमी परिसरातील गावे व वाड्या-वस्त्यांचा समावेश होणार आहे.