ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचे पत्र आले असून, आमदारांचे निवृत्तिवेतन तसेच पगारवाढीस विरोध करून त्याविरोधात जनहित याचिका दाखल करा; अन्यथा आपला पंधरा दिवसांत दाभोलकर करू अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. वैजापूर (जिल्हा औरंगाबाद) येथून हे पत्र आले आहे. हजारे यांच्या कार्यालयास मंगळवारी हे पत्र मिळाले. त्यांच्या कार्यालयाकडून या पत्राविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येत असली तरी राळेगणसिद्घी परिवाराकडून त्यास दुजोरा मिळाला. गेल्या दि. २९ ऑगस्टला देशात लष्करी राजवट लागू करण्याची मागणी करा अन्यथा तुमचा नरेंद्र दाभोलकर करू, अशा आशयाची धमकी या पत्रात देण्यात आली होती. या पत्रानंतर हजारे यांच्या सुरक्षायंत्रणेत वाढ करण्यात आली. हजारे सध्या राळेगणसिद्घीतच आहेत. या वेळचे पत्र पाकिटातून पाठविण्यात आले आहे. गेल्या पत्रातील मजकुराप्रमाणेच याही पत्रात हजारे यांना क्रांतिसूर्य असे संबोधण्यात आले आहे. मात्र दोन्ही पत्रांतील हस्ताक्षर भिन्न असल्याची माहिती समजली.
पोलीस यंत्रणेस माहिती दिल्यानंतर हजारे यांच्या कार्यालयाने पत्राविषयी मात्र कमालीची गुप्तता पाळली आहे. यासंदर्भात संपर्क साधला असता असे पत्रच आले नसल्याचे सांगण्यात आले. राळेगणसिद्घी परिवारातील सदस्यांशी संपर्क साधण्यात आल्यानंतर अशाप्रकारचे पत्र आल्याच्या वृत्तास दुजोरा देण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Sep 2013 रोजी प्रकाशित
अण्णा हजारे यांना पुन्हा धमकीचे पत्र
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचे पत्र आले असून, आमदारांचे निवृत्तिवेतन तसेच पगारवाढीस विरोध करून त्याविरोधात जनहित याचिका दाखल करा;
First published on: 12-09-2013 at 04:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare receives threat letter