उसाचे उत्पादन घटल्याने आतापर्यंत ३४ साखर कारखाने बंद; खासगी क्षेत्रालाही फटका
साखर पट्टय़ात दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा उसाचे उत्पादन कमी झाले असून, त्याचा फटका कारखान्यांना बसला आहे. दरवर्षी सरासरी पाच महिने चालणारे साखर कारखाने दोन महिन्यांमध्येच बंद करण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत ३४ कारखाने बंद झाले आहेत. खासगी कारखान्यांची स्थिती फारशी वेगळी नाही.
दुष्काळामुळे उसाचे उत्पादन कमी झाल्याने साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेळेआधीच आवरता घेण्याची वेळ आली आहे. पाच महिने चालणारे कारखाने यंदा केवळ दीड ते दोन महिनेच चालले आहेत. विशेष म्हणजे खासगी क्षेत्रातील कारखान्यांना पुरेसे गाळप करता आलेले नसून काहींचा अपवादवगळता बहुतेकांना शेतकऱ्यांनी ऊस देण्यात हात आखडता घेतला आहे. मराठवाडा व खानदेशातील कारखान्यांना हंगामच चालविता न आल्याने त्यावर नगर, पुणे व सोलापूर जिल्तील कारखान्यांनी डल्ला मारला आहे.
कारखाने सुरू करण्याची घाई
पुरेसा ऊस उपलब्ध नसतानाही विविध भागांमध्ये राजकीय फायद्याकरिता साखर कारखाने काढल्याची टीका नेहमी होते. पण ऊस नसताना गळीत हंगाम सुरू करण्याचा उद्योग राजकारणासाठी काही सहकारातील नेत्यांनी केला. विशेष म्हणजे खासगी कारखान्यांनीही त्यांचेच अनुकरण केले. त्यामुळे आता या कारखान्यांना तोटा होणार आहे. पुरेसे गाळप न झाल्याने कामगारांचे पगार, बँकांचे व्याज, बाहेरून आणावा लागणारा ऊस या सर्वाचा विचार करता क्षमतेपेक्षा कमी गाळप झालेल्या कारखान्यांना प्रतिटन २०० ते ८०० रुपयांपर्यंत तोटा सोसावा लागणार आहे. २५०० टन क्षमता असलेल्यांना पाच ते दहा कोटी तर पाच हजार टनांच्या पुढे दैनंदिन गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांना २५ ते ३० कोटींचा फटका बसणार आहे. यंदा नगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका असल्याने अनेकांनी कारखाने राजकारणात तग धरण्यासाठी सुरू केले होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख यांनी कारखाना सुरू करून चूक केल्याची जाहीर कबुली दिली. पण तोटा होऊनही अमित देशमुख वगळता इतरांनी तशी कबुली दिलेली नाही. मागील वर्षी ९३ सहकारी व ७४ खासगी अशा १६७ कारखान्यांनी ३४२.३१ लाख टन ऊसाचे गाळप करुन ३५८.५२ लाख टन साखरेची निर्मिती केली होती. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४७ एवढा होता. यंदा त्यात मोठी घट आली आहे. यंदाचा हंगाम साखर कारखान्यांसाठी वाईटच गेला आहे. सोलापूरचा लो.बा.पाटील इंडस्ट्रिज हा खासगी कारखाना ७ नोव्हेंबरला सुरू होऊन आठ दिवसांतच बंद पडला. केवळ १२,५०७ टनाचे गाळप झाले. सोलापूर जिल्ह्य़ातील भीमाटाकळी (सहकारी), सिद्धनाथ (खासगी) या कारखान्यांचेही गाळप अत्यंत नगण्य असे झाले आहे.
कोल्हापूर व सांगली आघाडीवर
कोल्हापूर, सांगली हे जिल्हे मात्र गाळपात आघाडीवर आहे. कोल्हापूरच्या १६ सहकारी तर सहा खासगी साखर कारखान्यांनी ५९ लाख २६,३७७ टन गाळप केले, तर सांगलीच्या सहकारातील ११ व खासगी चार कारखाने असे एकत्रित २६ लाख ७८ हजार ३३५ टनांचे गाळप केले. साताऱ्यातील नऊ सहकारी व सहा खासगी कारखान्यांनी ३१ लाख ८८५ टन, पुण्याच्या १० सहकारी व पाच खासगी कारखान्यांनी ३३ लाख ३७ हजार ९५९ टन, सोलापूरच्या नऊ सहकारी, १३ खासगी कारखान्यांनी ३० लाख ३६६ हजार टन तर नगरच्या १३ सहकारी व सहा खासगी कारखान्यांनी २८ लाख ५ हजार ९६६ टन उसाचे गाळप केले. अन्य जिल्ह्यातील उसाचे गाळप हे नगण्य असे आहे.
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम हा नोव्हेंबरमध्ये सुरू होऊन एप्रिलमध्ये संपतो. अनेकदा तो दीडदोनशे दिवस चाललेला आहे. पश्चिम महाराष्ट्र वगळता यंदा कारखाने महिनाभरही चालू शकलेले नाहीत. ३६ खासगी कारखाने हे उसाअभावी बंद राहिले. गणेशने २३ हजार ३०५, केदारेश्वरने २१,६२७ , सिध्दनाथ शुगरने १५,५५२, गिरणा आर्मस्ट्राँगने १९,२७५, चोपडाने १७ हजार, बळीराजा (परभणी) २७ हजार ९७४. वसंत (पुसद) २४.५०० टन असे नीचांक गळीत केले आहे, तर तात्यासाहेब कोरे (वारणा) सहा लाख १३ हजार, जवाहर पाच लाख ८० हजार, कृष्णा (सातारा) चार लाख ५५ हजार, सह्य़ाद्री (सातारा) चार लाख, ५२ हजार, इंदापूर (पुणे) ३ लाख १९ हजार, विठ्ठल िशदे (सोलापूर) सहा लाख ४५ हजार असे विक्रमी गळीत केले आहे.
अनेक कारखाने बंदच
दौलत (कोल्हापूर), तासगाव, रा.वी.डफळे – जत (सांगली), यशवंत – थेऊर, भिमा – पाटस (पुणे), शंकर, भोगावती, आदिनाथ, सांगोला, स्वामीसमर्थ, कूर्मदास (सोलापूर), डॉ. तनपुरे – राहुरी (नगर), निफाड, के.के.वाघ, वसंतदादा – कळवण (नाशिक), पांझराकान, शिरपूर (धुळे), वसंतकासोदा, बेलगंगा, रावेर (जळगाव), अंबेजोगाई, जयभवानी, कडा, गजानन, डॉ.विखे – केज, वैद्यनाथ (बीड), बाराशिव हनुमान – पूर्णा (िहगोली), कलंबर, शंकर, जयशिवशंकर (नांदेड), जिजामाता (बुलढाणा), जयकिसान, वसंत पुसद (यवतमाळ), देशमुख (वर्धा) हे सहकारी साखर कारखाने यंदा बंद राहिले. पण सर्वात वाईट परिस्थिती ही औरंगाबाद, उस्मानाबाद, लातुर व जालना जिल्ह्यांचे आहे. सिद्धेश्वर, विनायक, संत एकनाथ, देवगिरी, पठण, गंगापूर हे औरंगाबाद जिल्ह्य़ातील, तेरणा, तुळजाभवानी, डॉ. आंबेडकर, शिवशक्ती, नरसिंह, बाणगंगा, भाऊसाहेब बिरासदार हे उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच तर जय जवान जय किसान, मांजरा, शेतकरी किल्लारी, निलंगेकर, विकास, संत शिरोमणी, रेना हे लातूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने बंद राहिले. यातील अनेक कारखाने गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत.
गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीचा फटका साखर उद्योगावर झाला आहे. राज्यातील ८७ सहकारी, ६२ खासगी असे १४९ कारखाने गळीत हंगाम सुरू करू शकले. त्यांनी २५६.६३ लाख टन ऊसाचे गाळप करुन २७०.९४ लाख िक्वटल साखरेचे उत्पादन केले.
यंदा सरासरी साखर उतारा १०.५६ एवढा राहिला आहे. सांगली, कोल्हापूर या कारखान्यांचा साखर उतारा ११.६७ तर पुणे, सोलापूर, सातारा या कारखान्यांचा उतारा १०.४२ राहिला आहे.
मात्र औरंगाबादचा साखर उतारा सर्वात नीचांकी राहिला असून तो ८.५७ एवढा आहे. नगर, अमरावती व नागपूर, नाशिक, बीड, लातूर, परभणी, जालना कारखान्यांचा उतारा ९.३४ ते ९.६५ सरासरी एवढा आहे.
मागील वर्षीच्या साखर उताऱ्यावर शेतकऱ्यांना भाव मिळतो. यंदा उतारा घटल्याने पुढील वर्षी ऊस उत्पादकांना या वर्षीच्या भावापेक्षा किमान २०० ते ३०० प्रतिटन दर कमी मिळणार आहे. त्याला सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या भागाचा अपवाद असणार आहे.