मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे आमदार तसेच स्थानिक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. शिवसेना पक्षात अस्थितरतेचे वातावरण असताना आता काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र चर्चेवर मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. तसेच मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असे स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “उपमुख्यमंत्र्यांना खातंच दिलेलं नाही, प्रत्येक फाईल…”, अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला

विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनादरम्यान शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला होता. या विश्वासदर्शक ठरावाददरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे ११ आमदार गैरहजर होते. त्यानंतर या गैरहजर आमदारांवर हायकमांडकडून कारवाई केली जाणार, असे सांगण्यात येत होते. असे असताना अशोक चव्हाण नाराज असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या चर्चेविषयी बोलताना, “ही चर्चा कोण करत आहे. या चर्चेला काहीही महत्त्व नाही. मी कोणताही असा निर्णय घेतलेला नाही,” असे अशोक चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

हेही वाचा >>> “…तर त्यांचे फोटो कधीही ठेवणार नाही” संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना इशारा

दरम्यान, नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना याआधी खुली ऑफर दिली होती. चव्हाण यांनी बहुमत चाचणीसाठी गैरहजर राहून भाजपाला अप्रत्यक्षपणे मदतच केली आहे. अशोक चव्हाण भाजपामध्ये आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू,” असे प्रतापराव चिखलीकर म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan clarified said will not leave congress party prd