Avimukteshwaranand : महाराष्ट्रात मराठी आणि हिंदीचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्रिभाषा सूत्रानुसार तिसरी भाषा पहिलीपासून सुरु करण्याच्या निर्णयाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी विरोध दर्शवला. ज्यानंतर पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या एक दिवस आधी सरकारने त्रिभाषा सूत्रासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि आधीचे दोन्ही अध्यादेश रद्द केले. यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी वरळी या ठिकाणी विजयी मेळावा घेतला. ठाकरे बंधू एकत्र येण्याची ही सुरुवात आहे अशी चर्चा रंगली. दरम्यान शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरे कुटुंबच महाराष्ट्रात मगध येथून आलं आहे असं म्हणत हे दोन भाऊ फक्त मराठीच्या नावाने राजकारण करत असल्याचं म्हटलं आहे.
मराठीची ओळख कानशिलात लगावणारी भाषा म्हणून करायची आहे का?
कुठलंही कार्य करायचं असेल त्याची सुरुवात मोठ्या स्वरुपात करायची असते. मराठीचा प्रचार प्रसार कुणी करत असेल तर कुणाला काही अडवण्याचा प्रश्न येत नाही. पण मराठी भाषेची ओळख ही कानशिलात लगावण्याची भाषा अशी जर कुणी बनवत असेल तर त्यामुळे मराठीला यश मिळेल की कमी होईल? महाराष्ट्रात राहणारेच मराठीवर प्रेम करतात असं नाही. सगळा देश मराठीवर प्रेम करतो. झाशीची राणी लक्ष्मीबाई कुठून आली होती? कितीतरी नावं घेता येतील. हिंदी ही आपल्या देशाची राजभाषा आहे. देशाच्या बाहेरही अनेक भाग आहेत जिथे मराठी भाषा बोलली जाते असंही अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.
मराठीचा आग्रह जे आत्ता धरत आहेत ते ठाकरेच महाराष्ट्राच्या बाहेरचे
मराठीचा आग्रह जे धरत आहेत ते ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेरुन आले आहेत. त्यांच्याच कुटुंबातील आजोबा-पणजोबांनी जे लिहून ठेवलंय त्यात हे म्हटलं आहे की आम्ही मगधहून आलो होतो. मगधहून तुम्ही इथे आलात तेव्हा तुम्ही मराठी होतात का? महाराष्ट्राने मगधहून आलेल्या ठाकरेंना स्वीकारलं. त्यांना इतकं मोठं केलं की त्यांचे वंशज मराठीसाठी भांडत आहेत. मराठीला थोबाडीत देणारी भाषा, मारहाण करणारी भाषा बनवायची आहे का? राज ठाकरे जे म्हणाले आहेत की मराठी न बोलणाऱ्यांना थोबाडीत ठेवून द्या पण व्हिडीओ काढून नका. एक माणूस खुलेआम गुन्हा करायला सांगतो आणि पुरावे ठेवू नका म्हणतो आहे. याची दखल सरकारने घेतली पाहिजे असंही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.
राज आणि उद्धव ठाकरेंच्या विचारधारा वेगळ्या झाल्या आहेत
“ठाकरेंबाबत मी काही व्यक्तिगत भाष्य करणार नाही. मात्र या दोघांची युती यशस्वी होईल असं वाटत नाही. कारण राज ठाकरे यांचं राजकारण करण्याची पद्धत वेगळी आहे. उद्धव ठाकरेंच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. तसंच त्यांचे जे सहकारी सध्या आहेत त्यांचीही धोरणं वेगळी आहेत. त्यामुळे हे दोन बंधू एकसाथ जास्त काळ चालू शकणार नाहीत. कारण राज ठाकरे एका समाजाला घेऊन चालतात. उद्धव ठाकरे आता सर्वसमावेशक विचारांचे झाले आहेत. हिंदीला विरोध, मराठीचा आग्रह हा त्यांचा विषयच नाही. या सगळ्यातून ते राजकारणच करत आहेत आणि ते सगळ्यांना समजतंय.” अविमुक्तेश्वरानंद यांनी काही वेळापूर्वीच एबीपी न्यूजशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हिंदी राष्ट्रभाषा नाही तरीही राजभाषा आहेच-अविमुक्तेश्वरानंद
मराठी अस्मिता ही वेगळी बाब आहे. हिंदीत का बोलतात लोक? कारण देशाशी संवाद साधता येतो. बरं हे हिंदीला विरोध करत आहेत आणि इंग्रजीला पाठिंबा देत आहेत. असं का? तर जगाशी संपर्क तुम्हाला ठेवायचा आहे. इंग्रजीतून तुम्हाला जगाशी संपर्क ठेवायचा आहे मग हिंदीला विरोध का? हिंदी भारताची राजभाषा आहे. या ठिकाणी राज्यकारभार मराठीतून चालतो. मुंबईत देशातल्या अनेक भागांमधून लोक येतात. मात्र मुंबईसारखा भाग वगळता महाराष्ट्रात इतर ठिकाणी मराठीच बोलली जाते.