कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तीन राज्यांत कार्यक्षेत्र असलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बहुराज्य वर्गीकृत सहकारी बँकेने गुजरात राज्यात शाखाविस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात येणार आहे, अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांनी केली. चालू आर्थिक वर्षात बँक ५ हजार कोटी रुपयांचा टप्पा निश्चितपणे पार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बँकेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्याप्रसंगी स्वप्निल आवाडे बोलत होते. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बँकेचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून तीन हजार घरकुले उभारण्याचा मानस व्यक्त केला. अपप्रवृत्तींकडून माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून सहकार चळवळ मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशांची गय करू नका, असा सल्ला दिला.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगांवे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी एकमताने मंजुरी दर्शविली. आभार उपाध्यक्ष संजय अनिगोळ यांनी मानले.