संगमनेर : भोजापूर चारीचे काम काही पाच-सात महिन्यांत झालेले नाही. आता स्वतःला ‘जलदूत’ म्हणवून घेत मिरवणाऱ्यांचे निळवंडे धरणाच्या कामातही काहीच योगदान नव्हते. अविरत कष्ट आणि प्रामाणिकपणातून हा तालुका उभा राहिला आहे. मी चाळीस वर्षात काय केले हे विचारणाऱ्यांना आता जनतेनेच उत्तर दिले पाहिजे. तालुक्यात सध्या सुरू असलेले सुडाचे राजकारण दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
तालुक्याच्या सहकाराचा मानबिंदू असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्वश्री लक्ष्मणराव कुटे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे आणि बाबा ओहोळ, उपाध्यक्ष पांडुरंग घुले, बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्री थोरात, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी संचालक यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना थोरात म्हणाले की, ५८ वर्षांपूर्वी इथल्या माळरानावर कारखाना उभा केला तेव्हा सिंचन नसल्याने ऊसच नव्हता. परंतु मोठा संघर्ष करून आपल्या हक्काचे पाणी मिळवले म्हणून आता चांगले दिवस आले आहेत. सर्वांच्या मेहनतीतून तालुक्यातल्या सहकारी संस्था आणि इथला परिसर फुलला आहे. कारखाना चालवताना दैनंदिन अनेक अडचणी येतात. उसाची कमतरता हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. जवळपास ६० टक्के ऊस आपल्याला बाहेरून आणावा लागतो. हेक्टरी ९० टन ऊस उत्पादन ही शोभणारी गोष्ट नाही. एकरी १०० टन उत्पादन झाले तर कारखाना अधिक वेगाने पुढे नेता येईल. नवीन कारखाना उभारण्याचा आपला तेव्हाचा निर्णय कमालीचा यशस्वी ठरला. हे सगळे चार दोन वर्षात उभे राहिलेले नाही तर त्यामागे अनेक वर्षाचे सातत्यपूर्ण कष्ट आहेत, संघर्ष आहे. हा इतिहास सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच तालुक्यात सध्या सुरू असलेल्या स्वराच्या राजकारणापासून सगळ्यांनी सावध राहण्याचा इशाराही त्यांनी दिला.
डॉ. तांबे म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणच्या सहकारी संस्था कोसळत असताना संगमनेरच्या संस्था उत्तमपणे चालू आहेत. कष्ट, दूरदृष्टी आणि प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीमुळे हे यश टिकून आहे. सहकार महर्षी भाऊसाहेबांनी माळरानावर उभारलेल्या कारखान्याचा परिसर आज नंदनवन झाला आहे, यामागे अनेक वर्षांची मेहनत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक करून अहवाल वाचन केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. सर्वाधिक एकरी ऊस उत्पादन करणाऱ्या हरिभाऊ सागर, सोपान कोल्हे, मधुकर काळे, रवींद्र भोकनळ, पोपट वाळे, गोरख वाकचौरे, रावसाहेब लांडगे, बबन कातोरे, सतीश कोकणे, सुनील चतुरे, रूपाली तांबे, भाऊसाहेब नागरे, ताराबाई हासे, पुंजाहरी नवले, देवराम वाकचौरे, गोरख वाकचौरे आदी शेतकऱ्यांचा थोरात व डॉ. तांबे यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला.