सातारा: ज्येष्ठ एकपात्री कलाकार आणि कवी बंडा जोशी यांनी सादर केलेल्या ‘झेंडूची नवीन फुले’ या धमाल विनोदी एकपात्री कार्यक्रमाला रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. या झेंडूच्या फुलांनी निर्माण केलेल्या हास्यरसामध्ये रसिक न्हाऊन निघाले. रसिकांच्या टाळ्या आणि हशा यामुळे सभागृह दणाणून गेले. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आचार्य अत्रे यांच्या जयंतीचे निमित्त साधून बंडा जोशी यांनी झेंडूची नवीन फुले हा विडंबन काव्याचा कार्यक्रम सादर केला. सध्या लोकप्रिय असणाऱ्या विविध चित्रपटगीतांच्या चालीवर रचलेल्या विडंबन गीतांचे सादरीकरण करून त्यांनी रसिकांना मनमुराद हसवले. बंडा जोशी यांच्या या विडंबन काव्यामध्ये समकालीन राजकारण, मोबाईलचा अतिवापर, कौटुंबिक संबंध अशा अनेक मुद्द्यांचा समावेश होता. या मुद्यांचा वापर करून मार्मिक पद्धतीने कोपरखळ्या मारण्यात आल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलीस अधिकारी अशोक इंदलकर, डॉ संदीप श्रोत्री, मुकुंद फडके, डॉ. सुहास पाटील, शिरीष चिटणीस, विजय साबळे, डॉ. मोहन सुखटणकर, विनायक भोसले उपस्थित होते. डॉ. श्रोत्री यांनी यावेळी आचार्य अत्रे यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. शिरिष चिटणीस यांनी दीपलक्ष्मी सभागृहामध्ये अशा प्रकारचे वैविध्यपूर्ण कार्यक्रम यापुढेही आयोजित केले जातील, असे सांगितले आणि बंडा जोशी यांनी सादर केलेल्या कार्यक्रमामुळे रसिकांचा एक तास चांगला गेला, अशी दाद दिली.
मुकुंद फडके यांनी आपल्या भाषणामध्ये झेंडूची फुले कायम टवटवीत राहतात. या फुलांना जरी सुवास नसला तरी ते दीर्घकाळ टवटवीत असतात. बंडा जोशी यांचे हे विडंबन काव्य असेच टवटवीत असून, त्यामुळेच रसिकांना त्याचा मनापासून आनंद घेता आला, असे सांगितले.