बीड – परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या सुभाष राठोड यांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे वीज निर्मिती कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. असे असले तरी पोलिसांनी मात्र अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

परळीतील नवीन औष्णिक वीज निर्मीती केंद्रातील अभियंता सुभाष नामदेव राठोड हे १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते ८.१५ वाजण्याचे सुमारास कार्यालयातून निवासस्थानाकडे जात असताना चेंबरी विश्रामगृह समोर चारचाकी गाडी आडवुन अज्ञात चार युवकांनी गाडीला कट मारल्याच्या कारणावरून राठोड यांना मारहाण केली. यात त्यांच्या पायाला मार लागल्याची माहिती आहे. अभियंता सुभाष राठोड यांना गाडीला कट मारण्याचे कारणावरून मारहाण झाल्याची तक्रार संभाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवली गेली असली तरी खरे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. मारहाणीचे घटना नेमके कशामुळे घडली याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.