भाजप पदाधिकारी, कार्यकर्तेही रस्त्यावर
सूरजागड येथील लॉयड मेटल्स कंपनीचे लोहखनिज उत्खनन व वाहतूक तातडीने बंद करावी तसेच पोलाद उद्योग येथेच सुरू करावा, या मागणीसाठी सूरजागड बचाव संघर्ष समितीच्या वतीने आयोजित ‘एटापल्ली बंद’ला लोकांचा शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चक्काजाम व मोर्चामुळे एटापल्लीत कडकडीत बंद होता. या बंदसाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले होते.
एटापल्ली तालुक्यातील सूरजागड येथील लोहखनिजांचे साठे केंद्र शासनाने लॉयड मेटल्स या कंपनीला दिले आहेत. या कंपनीने एटापल्लीतच पोलाद उद्योग उभारण्याचे सुरुवातीला आश्वासन दिले होते. मात्र, लोहखनिज ट्रकमध्ये भरभरून चंद्रपूर जिल्ह्य़ातील घुग्घुस येथे पाठविण्यात येत आहेत. गेल्या महिन्याभरात या कंपनीने शेकडो ट्रक्स घुग्घुस येथे पाठविले आहेत. या लोह खाणीतून स्थानिकांना रोजगार मिळणार नसेल तर त्याचा काय फायदा म्हणून एटापल्ली व परिसरातील १२ गावांतील लोकांनी मिळून सूरजागड बचाव संघर्ष समिती स्थापन केली. या माध्यमातून दररोज आंदोलन सुरू आहे. गेल्या आठवडय़ात लॉयड मेटल्सचे ट्रक अडवून धरण्यात आले होते. त्यानंतर सूरजागड पहाडावर परिसरातील ५०० गावकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. त्यानंतर एटापल्ली बंदच्या केलेल्या आवाहनाला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी पहिले चक्काजाम आंदोलन करून ट्रक वाहतूक रोखण्यात आली. त्यानंतर बाजारपेठ बंद करण्यात आली. मेडिकल स्टोअरपासून तर रुग्णालयापर्यंत व साध्या किराणा दुकानापासून तर भाजीपाल्यापर्यंत सर्व दुकाने व व्यापार पूर्णत: बंद होता.
यावेळी सूरजागड बचाव संघर्ष समितीच्या वतीने एटापल्लीतून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात आला. यात परिसरातील १२ गावातील शेकडो लोक सहभागी झाले होते. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या बंदला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दिला. भाजपचे एटापल्ली तालुकाध्यक्ष नवीन बाला शेकडो कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले होते.
पालकमंत्री अंबरीश आत्राम, खासदार अशोक नेते व दोन्ही आमदार लॉयड मेटल्स कंपनीच्या बाजूने उभे झालेले असतांनाच भाजप कार्यकर्त्यांनी मात्र या उत्खननाला तीव्र विरोध दर्शविला आहे.