सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सर्व नऊ आगारांमध्ये एसटी बससेवा ठप्प असताना शुक्रवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात अक्कलकोट-सोलापूर बस प्रवासी भरून सोडण्यात आली. हा अपवाद वगळता सर्व आगारांमध्ये एसटीची चाके रूतलेलीच आहेत.

दरम्यान, सायंकाळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एसटी विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. त्यानंतर देशमुख यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी व काही एसटी कर्मचाऱ्यांनी विभागीय नियंत्रक विलास राठोस यांना घेराव घातला. त्यावेळी राठोड यांचा हात धरण्यापर्यंत मजल गेली. त्यामुळे आंदोलनस्थळी आणि विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. दुसरीकडे दुपारी संभाजी आरमार नावाच्या संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत आंदोलनस्थळी मुंडन करून घेतले. संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याची हीच वेळ असल्याचे सांगितले.