राज्यात करोनाचा कहर वाढत असून पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्याकडे लक्ष वेधत तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृती दलाने दोन आठवड्यांच्या कडक लॉकडाउनची शिफारस केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाउनबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा आदेश दिला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत लॉकडाउनचा निर्णय घेतला जाण्याची चिन्हे आहेत. दरम्यान यावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

…याचंही केंद्राने भान ठेवलं पाहिजे; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप

देवेंद्र फडणवीस पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मंगळवेढा येथे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “आम्ही नेहमी म्हणायचो महाराष्ट्रात लोकशाही आहे, पण आता लोकशाहीऐवजी लॉकशाही चालू आहे…म्हणजेच लॉकडाउन”.

“कधी लॉक करायचं…कधी अनलॉक करायचं…ठीक आहे तेदेखील आवश्यक असतं. परंतू जेव्हा आपण जेव्हा अशाप्रकारे लॉकडाउन करतो, लोकांचा रोजगार जातो तेव्हा किमान त्या लोकांना दिलासा म्हणून आपल्या तिजोरीतून २ रुपये दिले पाहिजेत. याचं मात्र सरकारला कुठेही भान दिसत नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं
“हे राष्ट्र एक आहे आणि ते एक ठेवण्याचा प्रयत्न मला दिसत नाही. प्रशासनाला हाताशी धरुन संकटातही राजकारण केलं जात असून याचा निषेध केला पाहिजे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सर्वात प्रथम विरोधी केला पाहिजे कारण हा महाराष्ट्राचा सुद्दा अपमान आहे. जर त्यांना अपमान वाटत नसेल तर त्यांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही,” अशा शब्दातं संजय राऊत यांनी भाजपाला सुनावलं आहे.

राज्यात दोन-तीन दिवसांत लॉकडाउन
करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असले तरी ती तातडीने लागू केली जाणार नाही. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता दोन आठवड्यांच्या कडक लॉकडाउनची शिफारस तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृती दलाने केल्याने लॉकडाउनबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला असून, येत्या दोन-तीन दिवसांत लॉकडाउनचा निर्णय घेतला जाण्याची चिन्हे आहेत.

करोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या लॉकडाउन हा एकमेव पर्याय असल्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला. याबरोबरच सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. राज्यात लॉकडाउन लागू करण्याचे संकेत शनिवारी देण्यात आले होते. परंतु, लगेचच सोमवारपासून लॉकडाउन लागू केली जाणार नाही. सामान्य जनतेला दोन-तीन दिवसांचा अवधी द्यावा, अशी सूचना सर्वच राजकीय नेते व व्यापारी संघटनांनी केली होती. त्यानुसार पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनंतरच लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल. बहुधा १५ तारखेनंतर राज्यात लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो. त्यासाठी पुढील दोन-तीन दिवसांत राज्यातील रुग्णसंख्येचा आढावा घेतला जाईल. सर्वांशी चर्चा करूनच दोन-तीन दिवसांत टाळेबंदीचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp devendra fadanvis on maharashtra government over lockdown sgy