मालेगाव महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मालेगाव महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत. मालेगाव महापालिकेतील ८४ जागांपैकी ७७ जागांसाठी भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे यामधील तब्बल ४५ उमेदवार मुस्लिम आहेत.

मालेगाव महापालिका निवडणुकीच्या आधीच भाजपने इतिहास रचला आहे. एकाच निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम उमेदवारांना संधी देण्याची भाजपची ही पहिलीच वेळ आहे. याआधी देशभरात भाजपने कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात मुस्लिमांना उमेदवारी दिलेली नाही. एकाच निवडणुकीत सर्वाधिक मुस्लिम उमेदवारांना संधी देण्याचा विक्रम भाजपने मालेगाव महापालिका निवडणुकीत केला आहे. ‘मोदी लाटे’त नैय्या पार करण्याचा प्रयत्न मालेगावात भाजपकडून सुरू आहे.

मालेगावमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत ७३ उमेदवार उभे केले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) आघाडीने ६६ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमनेदेखील मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. एमआयएम पहिल्यांदाच मालेगाव महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. तर शिवसेनेने २५ जागांवर उमेदवार दिले आहेत.

मागील महापालिका निवडणुकीत भाजपने २४ उमेदवार दिले होते. त्यावेळी भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाले होते. भाजपच्या १२ उमेदवारांना अनामत रक्कमदेखील वाचवता आली नव्हती. सध्या मालेगाव महापालिकेत काँग्रेसचे २५, राष्ट्रवादी काँग्रेसचे २२ तर शिवसेनेचे ११ नगरसेवक आहेत.