Chandrakant Patil On Rohit Pawar : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील हे आमदार रोहित पवार यांच्यावर चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं आहे. आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निलेश घायवळ प्रकरणावरून जोरदार टीका केली होती. मात्र, या टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील हे रोहित पवारांवर संतापले आहेत. ‘रोहित पवारांना काय काम धंदा आहे, लई नेता व्हायला लागला. जरा तरी स्वत:ची पत सांभाळून राहा’, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

“मी माझ्या कार्यालयात बसलो असताना त्या रिक्षावाल्याची मुलगी आली आणि रडायला लागली. मग मी म्हटलं की कोण डीसीपी आहे त्यांना फोन लावा, तेव्हा डीसीपींना म्हटलं की गौतमी पाटील असो किंवा कोणीही असो, गुन्हा दाखल करा. तेव्हा ते म्हणाले की गौतमी पाटीलने मान्य केलं की अपघातावेळी ती कारमध्ये नव्हती, पण कार माझी होती, त्यामुळे त्या रिक्षावाल्याचा सर्व खर्च मी करेन. तेव्हा मी सांगितलं की त्यामध्ये लक्ष घाला, एवढंच”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांना सुनावलं

“रोहित पवारांना काय काम धंदा आहे, लई नेता व्हायला लागला. जरा तरी स्वत:ची पत सांभाळून राहा. मला रोहित पवारांनी शिकवण्याची वेळ आलेली नाही. निलेश घायवळ विषयामध्ये मी काय केलं जाहीरपणे सांगू का? मग त्या प्रकरणात आपोआप लुकाऊटची ऑर्डर निघाली का? त्यांना प्रत्येक वेळी ढोल वाजवण्याची सवय आहे, तशी सवय आम्हाला नाही”, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.

नेमकं काय घडलं?

गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षा चालकाला धडक दिल्याची घटना घडली. या घटनेमध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणात गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणी रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केली. या रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी मंत्री पाटील यांनी थेट पोलीस उपायुक्तांना फोन केला आणि ‘गौतमी पाटीलला उचलणार की नाही?’ असं म्हणत कारवाईचे निर्देश दिले. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर रोहित पवार यांनी त्यांच्या विधानाचा व्हिडीओ एक्सवर (ट्विटर) शेअर करत काही सवाल विचारले होते.

रोहित पवारांनी काय म्हटलं होतं?

“माननीय चंद्रकांतदादा पाटील, तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही. गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळे रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे, दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे. पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही”, असं रोहित पवार यांनी म्हटलं.

“आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात. पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल. पण गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात?”, असंही रोहित पवार यांनी म्हटलं होतं.