राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये करोनाची आकडेवारी जरी कमी होताना दिसत असली, तरी Delta Plus व्हेरिएंटचे रुग्ण आणि तिसऱ्या लाटेचा धोका या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंधांची पातळी पुन्हा वाढवली आहे. राज्यातले सर्व जिल्हे करोना निर्बंधांच्या तिसऱ्या टप्प्याच्या वरच ठेवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी अजूनही गर्दी होत असताना मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने गर्दी टाळण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, शिवसेनेच्या आमदारांकडून मुख्यमंत्र्यांच्या या आदेशांना पायदळी तुडवण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे. यासाठी त्यांनी ट्विटरवर दोन फोटो देखील शेअर केले आहेत.
संजय राठोड यांच्या वाढदिवसात गर्दी?
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करून शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आह. “ही आहे शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या वाढदिवसाची हुल्लडबाजी. पक्षप्रमुख, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सगळ आदेश पायदळी तुडवलेतच. शिवाय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीभोवती यांचे फेकलेले हारतुरे. वाह रे बहाद्दर वाह. पक्षप्रमुखांसोबत महाराजांचाही अपमान”, असं चित्रा वाघ आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत. या ट्वीटमध्ये त्यांनी संजय राठोड यांच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले असून एकीकडे कार्यक्रमातली गर्दी आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा फोटो शेअर केला आहे.
ही आहे शिवसेना आमदार संजय राठोडच्या वाढदिवसाची हुल्लडबाजी
पक्षप्रमुख राज्याचे मा॰मुख्यमंत्र्यांचे सगळे आदेश पायदळी तुडवलेतचं शिवाय महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीछत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीभोवती यांचे फेकलेले हारतुरे
वाह रे बहाद्दर वाह
पक्षप्रमुखांसोबत महाराजांचाही अपमान