बीड : ‘आपण कधीही जातिभेद केला नाही. माणसाकडे जातीय कंगोऱ्यांनी पाहायचे कधी मी शिकले नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनीही कधी जातभेद करून कोणाला वागणूक दिली नाही. त्यांच्या जातिभेदापलीकडच्या माणुसकीने पाहण्याचा आणि संघर्षाचा वारसा घेऊनच माझीही वाटचाल सुरू असून, समाजघटकाला खाली मान घालायला लावणारे कृत्य माझ्याकडून कधीही घडणार नाही,’ असे सांगत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी कलियुगात रक्तबीजासारखे, भस्मासुरासारखे जातिवादाचे आणि धर्मवादाचे जे राक्षस जन्माला आले आहेत, त्यांना नेस्तनाबूत करण्याचे आवाहन सावरघाट (ता. पाटोदा) येथील दसरा मेळाव्यात गुरुवारी बोलताना केले.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवानगडावर दसरा मेळावा घेऊ दिला गेला नसल्याच्या आठवणी सांगत आणि सावरघाटमध्ये मेळावा घेण्यापर्यंतचा प्रवास पंकजा मुंडे यांनी या वेळी मांडला. भगवान गडाच्या पायथ्याशी एकदा मेळावा घ्यावा लागला. सावरघाट हे भगवान बाबांचे मूळ जन्मगाव आहे, हे कोणाला माहीतही नव्हते. परंतु आता येथील मेळावा ही एक परंपरा होऊन गेली, असे सांगून पंकजा मुंडे यांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांना सुनावत भगवानगडावरील दसरा मेळावा हिरावून घेतला, आता हा मेळावाही तुम्हाला बंद पाडायचा आहे का? असा प्रश्न केला.
व्यासपीठावर माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे, माजी खासदार डाॅ. प्रीतम मुंडे, माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, आर्यन पालवे आदींची उपस्थिती होती. तर मेळाव्याला आमदार नमिता मुंदडा, आमदार नारायण कुचे, आमदार संजय केणेकर आदींनीही आवर्जून उपस्थिती लावली होती.
अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचे आवाहन दोन घास कमी खा, पण स्वाभिमानाने राहायला शिका. तुमचा स्वाभिमान हाच माझा अभिमान आहे. तुम्ही माझ्या नावाने घोषणा दिल्याने मोठे होणार नाहीत. भगवान बाबांनी सुरू केलेले सीमोल्लंघन समाजघटकाच्या गर्दीने यशस्वी करून दाखवले आहे. अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाला त्याची जात-धर्म न पाहता मदत करावी, सौहार्दता जपावी, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले.