सोलापूर : मोहोळ तालुक्यात  तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बलाढ्य ताकदीला टक्कर देणारे आणि यापूर्वी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून लढलेले संजय क्षीरसागर यांनी यंदा पक्षातून थेट राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या बुधवारी दुपारी मोहोळ येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.  यशवंत सेना संघटनेची उमेदवारी घेतली आहे. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर क्षीरसागर यांना यशवंत सेनेकडून सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळाली होती. परंतु त्यांनी निर्णय बदलून थेट राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणे पसंत केले आहे.

मोहोळ तालुका १९९९ पासून  राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असताना या पक्षाचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांच्या विरोधात आव्हान देणारे मोहोळ येथील नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे बंधू संजय क्षीरसागर यांनी कधी शिवसेना तर कधी भाजपच्या माध्यमातून आव्हान दिले होते. विशेषतः मोहोळ विधानसभा मतदारसंघ २००९ साली राखीव झाल्यानंतर आतापर्यंतच्या तिन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी तत्कालीन राष्ट्रवादीशी कडवी झुंज दिली होती. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून संजय क्षीरसागर हे तत्कालीन राष्ट्रवादीचे रमेश कदम यांच्या विरोधात ५३ हजार ७५३ मते घेऊन दुस-या स्थानावर राहात ८३६७ मतफरकाने पराभूत झाले होते.

हेही वाचा >>> कंगना, गडकरी, राहूलना मते किती मिळतील ते अचूक सांगा, २१ लाख रुपये बक्षिस मिळवा – अंनिसचे ज्योतिषांना आव्हान

तत्पूर्वी २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे बंधू नागनाथ क्षीरसागर यांना शिवसेनेचे जाहीर केलेली उमेदवारी शेवटच्या क्षणी रद्द केली असता त्यांनी अपक्ष उभे राहून द्वितीय स्थानावरील ५२ हजार ४५२ एवढी मते घेतली होती. मागील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत नागनाथ क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राष्ट्रवादीविरूध्द कडवी झुंज देत ६८ हजार ८३३ मते मिळविली होती. तथापि, अलिकडे भाजप व शिवसेनेच्या बदलत्या राजकीय प्रवाहात मोहोळचे क्षीरसागर बंधू दुरावले असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून मोहोळची राष्ट्रवादी काँग्रेसची बडी मंडळी अजित पवार गटात सहभागी झाली. पर्यायाने हीच मंडळी सत्ताधारी महायुतीच्या माध्यमातून सत्ता वर्तुळात कायम राहिली. ज्यांच्या विरोधात तिन्ही विधानसभा निवडणुकीत जोरदार टक्कर दिली, त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक ज्येष्ठ नेते राजन पाटील यांचे महत्व सध्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपकडूनही कायम राहिले आहे. त्यामुळे संजय क्षीरसागर भाजपवर नाराज होते.