MLA Gopichand Padalkar on Gym: भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे अनेकदा वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. विरोधकांवर टीका करताना किंवा हिंदुत्वाचे मुद्दे उपस्थित करताना त्यांनी केलेली विधाने अनेकदा वादात अडकली आहेत. आता नुकतेच त्यांनी बीड जिल्ह्यात केलेल्या विधानानंतर वाद उद्भवला आहे. हिंदू महिला आणि मुलींनी जिममध्ये जाऊ नये, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड हे तुरूंगात धर्मांतराचे रॅकेट चालवतात, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता. त्यानंतर बीड जिल्ह्यात एका सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी मुली आणि महिलांना आवाहन केले.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “जिममध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा? आपल्या तरूण मुली जिममध्ये जात असतील तर त्यांना सांगा घरातच योगा करा. तिकडे जाण्याची गरज नाही. ते तुम्हाला फसवत आहेत. तुमच्यावर अन्याय करत आहेत.”
तसेच ज्या शहरात महाविद्यालये आहेत, त्या महाविद्यालयात विद्यार्थी सोडून दुसऱ्या कोणत्याही पुरूष किंवा मुलास प्रवेश देता कामा नये. महाविद्यालय परिसरात जिहादी प्रवृत्तीची मुले दिसली तर पोलिसांनी त्यांना धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. पोलिसांना माझी विनंती आहे की, हे खूप मोठे षडयंत्र आहे.
गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, “बीड जिल्ह्यात जिहादी प्रवृत्तीच्या लोकांची प्रकरणे अधिक व्हायला लागली आहेत. दुसऱ्यांची जमीन ताब्यात घेणे, सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणे, तिथे झोपडपट्टी उभी करणे, तिथे वेगवेगळे व्यवसाय उभे करणे, देशी गाईंची कत्तल करणे, हे प्रकार कुणी रोखण्यास गेले तर त्यांना मारहाण करून त्यांची तक्रार करणे. गावागावत असे अनेक प्रकार घडत आहेत.”
जिल्ह्यातील एका कोट्यधीशाच्या मुलीला फूस लावून तिचे लग्न लावून घेतले, असे अनेक प्रकरणे घडली आहेत. या प्रकरणांच्या बाबतीत लोकांमध्ये जागृती होण्याची गरज आहे. मुख्यमंत्री अशा प्रकारांच्या विरोधात आहेत. विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मदत केली होती. सर्वधर्म समभावाच्या नावाखाली हे प्रकार खपवून घेणार नाही, असेही आमदार पडळकर म्हणाले.