भाजपा आमदार नितेश राणे यांनी कोल्हापूरमधील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणानंतर संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा धर्मांतरविरोधी कायद्याचा उल्लेख केला असून, त्याचा अभ्यास सुरु असल्याची माहिती दिली आहे. ‘लव्ह जिहाद’ सारख्या प्रकरणात काही पोलीस अधिकारी संबंधितांना मदत करतात असा आरोपही त्यांनी केला आहे.
कोल्हापूरमध्ये १७ ऑक्टोबरपासून बेपत्ता असणारी अल्पवयीन मुलगी सापडली आहे. कोल्हापूर पोलिसांनी मुलीसह तिला आपल्या जाळ्यात ओढून नेणाऱ्या मुलालाही शोधलं आहे. दोघांना कर्नाटकातील संकेश्वरमधून ताब्यात घेण्यात आलं. नितेश राणे यांनी याप्रकरणी आंदोलन केलं होतं.
“कोल्हापूरमधील तरुणी १८ दिवसांपासून गायब होती. आम्ही जन आंदोलन केल्यानंतर ती तरुणी काही तासात घरी कशी येते?,” असा प्रश्न उपस्थित करत नितेश राणेंनी पोलिसांच्या कारवाईवर शंका घेतली.
“राज्यात हिंदुत्ववादी सरकार आलं असून हिंदू समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला अशा पद्धतीने टार्गेट केलं तर आम्ही सोडणार नाही अशी सरकारची भूमिका आहे. येणाऱ्या अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याचा अभ्यास सुरू असून लवकरच कायदा येईल आणि अशा घटना थांबतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी रेट कार्ड”
हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिलं जात असून, यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आलं असल्याचा आरोप याआधी नितेश राणे यांनी केला होता. अहमदनरमध्ये अल्पवयीन मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडत, अत्याचार करण्यात आले होती. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा मुद्दा उपस्थित केला होता.
“हिंदू मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यासाठी पैसे दिले जातात, बाईक दिली जाते. धर्मपरिवर्तनाला बळ देण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे. रेट कार्ड करण्यात आलं आहे. शीख तरुणीला फसवलं तर सात लाख, पंजाबी हिंदू तरुणीला फसवलं तर सहा लाख, गुजराती ब्राह्मण तरुणीसाठी सहा लाख, ब्राह्मण तरुणीसाठी पाच लाख, क्षत्रिय तरुणीसाठी चार लाख असं रेट कार्ड आहे. तरुणींना विकण्यापर्यंत यांची मजल जात आहे. धर्म परिवर्तनाच्या नावाखाली मुलींचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे,” असं राणे म्हणाले होते.