Udayanraje Bhosle on Nagpur Violence: औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी महाराष्ट्रात काही दिवसांपासून होत आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार आलेल्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागपूरमध्येही शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी काही संघटनांनी निदर्शने केली होती. मात्र कबरीच्या मुद्द्यावरून नागपूरमध्ये सोमवारी रात्री (१७ मार्च) हिंसाचार उसळला. समाजकंटकांनी दगडफेक करत अनेक ठिकाणी जाळपोळ केली. या घटनेचे पडसाद विधीमंडळ अधिवेशनातही उमटले असून देशभरातून अनेक नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले उदयनराजे भोसले?

“नागपूरमध्ये झालेली दंगल निषेधार्ह आहे. याचे कुणीही समर्थन करू शकत नाही. लोकांनी विचार केला पाहिजे, जे मुठभर व्यक्तीकेंद्रीत लोक वैयक्तिक स्वार्थाने पेटून उठलेले असतात. अशा लोकांची कोणतीही जात-पात नसते. अशांना ठेचून काढण्याचे काम समाजाने केले पाहिजे. भारताला अखंड ठेवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावे लागतील”, अशी गरज खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

केंद्र आणि राज्य सरकारने शासन मान्य असलेला इतिहास प्रकाशित करण्यात यावा. यामुळे इतिहासावरून वाद होणार नाही, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली. तसेच भाजपाच्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, याबद्दल त्यांना शिक्षा झालेली नाही, असा प्रश्न उदयनराजे भोसले यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, महाराजांचा अवमान होईल, असे विधान करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी माझी पूर्वीपासूनची मागणी आहे.

नितेश राणेंचे विधान उत्साहात

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात कुणीही मुस्लीम सैनिक नव्हते, असा दावा मंत्री नितेश राणे यांनी केला होता. यावर प्रश्न विचारला असता खासदार उदयनराजे म्हणाले की, त्यांनी ते विधान उत्साहात केले असावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व जाती-धर्माच्या सैनिकांचा समावेश होता. तसेच भाजपाच्या काही लोकांकडून करण्यात येणाऱ्या वादग्रस्त विधानाबाबत बोलताना ते म्हणाले की, मी आज याठिकाणी भाजपाचा नेता म्हणून नाही तर भारताचा एक नागरिक आणि छत्रपतींच्या कुटुंबातील सदस्य म्हणून भूमिका मांडत आहे.

याशिवाय काँग्रेसने त्यांची सत्ता असताना ध्रुवीकरणाचे राजकारण केले होते. त्यांच्या काळातच अधिक दंगली उसळल्या होत्या, असाही आरोप उदयनराजेंनी केला. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ नये, अशीही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp udayanraje bhosle slams congress for appeasement politics demand strict action against rioters kvg