शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांची गाडी अडवत त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तसंच त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही झाली. नाशिकमधल्या मनमाड या ठिकाणी ही घटना रात्री ११.३० च्या सुमारास घडली. आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी ही घोषणाबाजी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संभाजी भिडे हे येवला या ठिकाणाहून मालेगावला जात असताना ही घटना घडली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत काळे झेंडे दाखवणाऱ्यांना दूर केलं.

नेमकी काय घटना घडली?

संभाजी भिडे येवला या ठिकाणाहून मालेगावच्या दिशेने जात असताना त्यांची कार अडवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर काही जणांनी काळे झेंडे दाखवले आणि संभाजी भिडे मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या. काही तरुण हे थेट संभाजी भिडे ज्या कारमध्ये बसले होते त्या कारच्या समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि घोषणाबाजी करणाऱ्यांना आणि कारसमोर आलेल्या तरुणांना बाजूला सारले. त्यानंतर संभाजी भिडे यांची कार धुळ्याच्या दिशेने पुढे गेली. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- VIDEO : “देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना जरांगे-पाटलांकडे पाठवलं असेल, तर…”, जयंत पाटलांचा टोला

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे येवला येथून मालेगावच्या दिशेने निघाले होते. मनमाड या ठिकाणाहून संभाजी भिडे मालेगावच्या दिशेने जाणार आहेत याची माहिती काहीजणांना मिळाली. पोलीस बंदोबस्तात भिडे यांची कार मनमाडमध्ये दाखल होताच काही जणांनी कारच्या समोर येत जोरदार घोषणाबाजी करत भिडे यांची कार अडवली. त्यामागून येणारी पोलिसांची कारही अडवली. या सगळ्यांच्या हातात संभाजी भिडेंचा निषेध करणारे बॅनर होते. कार समोर आलेल्या तरुणांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांना काळे झेंडे दाखवले. कारच्या मागच्या आणि पुढच्या काचेवर काहींनी जोरजोरात हाताने फटकेही मारले. तर एका तरुणाने पायातला बूट काढून काचेवर आदळला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं. पोलिसांनी रस्ता मोकळा करुन दिल्यानंतर संभाजी भिडे मालेगावच्या दिशेने गेले.