अलिबाग : श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव बोगस डॉक्टराने केलेल्या उपचारांमुळे महिलेची प्रकृती चिंताजनक झाली आहे. या घटनेनंतर डॉक्टर विरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर रंगराव कुंभार असे तथाकथीत डॉक्टरचे नाव आहे.शंकर कुंभार हे कुडगाव परिसरात गेली १५ वर्ष दवाखाना टाकून रुग्णांवर उपचार करत होते. कुडगाव मधील एक महिला त्यांच्याकडे तपासणी साठी आली होती. या महिलेला डॉक्टर कुंभार यांनी गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. मात्र या गोळ्यामुळे महिलेची प्रकृती बिघडली. तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे तिची प्रकृती खालावली. तिला आधी श्रीवर्धन येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नतंर तिला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

गरोदर महिलांची तपासणी, त्यांच्यावर उपचार आणि गर्भपात करण्याचे कुठलेही अधिकार नसतांना डॉ. कुंभार यांनी या महिलेवर उपचार केले. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली. गर्भपातामुळे तिचा जीव धोक्यात आल्याची बाब समोर आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, श्रीवर्धन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नारायणकर यांनी डॉ. कुंभार याच्या विरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर डॉ. कुंभार यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ८८. ९२, १२५ सह वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ तसेच वैद्यकीय गर्भपात दुरुस्ती कायदा २०२१ च्या कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पोलीस उपनिरीक्षक शेख या प्रकरणाचा तपास करत आहेत.

श्रीवर्धन मधील बोगस डॉक्टरांकडून होणाऱ्या उपचारांबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे महीलेचा जीव धोक्यात आला. एजाज हवालदार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंभार यांच्या प्रमाणे तालुक्यात अनेक बोगस डॉक्टर कार्यरत असून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची तपासणी केली जावी अशी तक्रार लेखी स्वरुपात मी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे केली होती. मात्र त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. वेळीच जर प्रशासनाने बोगस डॉक्टरांवर कारवाई केली असती तर कुडगाव येथील महिलेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला नसता, धवल तवसाळकर, सामाजिक कार्यकर्ते.