रत्नागिरी – गुहागर हेदवतड येथे जाहीर सभेत खोतकीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन गुहागर येथील ब्राम्हण समाज आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यात नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. मात्र याला आमदार जाधव यांनीदेखील प्रत्युत्तर दिले आहे.
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्ता मेळावा सभेत डॉ. विनय नातू व शिवसेना शिंदे गटाचे रामदास कदम यांच्यावर टीकेच्या फैरी झाडल्या होत्या. यावरुन भाजपा आक्रमक झाली असताना आता या वादात ब्राम्हण समाजाने उडी घेतली आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्याच्या ऐक्याला बाधा आणण्याचे काम भास्कर जाधव करीत असल्याचा आरोप ब्राह्मण समाजाने केला आहे.
राजकीय प्रवासात जाधव यांनी ब्राह्मण समाजातील अनेक उंबरठे आणि ओट्या झिजवल्याची आठवण एका पत्राद्वारे आमदार भास्कर जाधव यांना करून दिली आहे. मात्र, ब्राह्मण सहाय्यक संघाच्या या पत्राला आमदार भास्कर जाधव यांनीदेखील प्रत्युत्तर दिले आहे.
या प्रत्युत्तरामध्ये गुहागर तालुक्यातील लेखणीचा दहशतवाद आपणच संपवला असल्याच्या विधानावर भास्कर जाधव ठाम रहात, म्हणाले की, मी येण्यापूर्वी गुहागरमध्ये विरोधी पक्ष निवडणूक हरला की, त्याच्या घरावर दगड पडायचे. हा दहशतवाद आपण गुहागरमध्ये आल्यानंतरच संपल्याचे जाधव यांनी सांगितले.
आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर तालुका ब्राम्हण सहाय्यक संघाचे अध्यक्ष धनशाम जोशी यांना पत्र लिहून टीका केली आहे. इतिहासाचे सिंहावलोकन मी जरूर करतो पण त्यात रमणारा कार्यकर्ता मी नाही. वर्तमानातही जात धर्म, पंथविरहीत विकास केलेला असल्याचे जाधव यांनी पत्रात म्हटले आहे. गुहागर तालुक्यात ब्राह्मण समाजातील व्यक्तीला प्रथमच सभापती होण्याचा बहुमान मी मिळवून दिला. त्याबद्दल एखादे कौतुकाचे पत्र पाठवण्याकरता तुम्हाला लाजच वाटली असावी. तसेच प्रवीण ओक व त्यांच्या सौभाग्यवती पूर्वा ओक यांनादेखील दोन वेळेला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली व त्यांना निवडून आणले. गीता खरे यांना नगरपंचायतीमध्ये निवडून आणून सभापती केले, हे तुम्ही सोयीस्कररित्या विसरलात, असेही जाधव म्हणाले. त्यामुळे एखाद्या राजकीय सभेमध्ये मी जर एखादे राजकीय वाक्य बोललो असेल तर त्याचा संपूर्ण समाजाशी संबंध जोडणे हे तुमच्यासारखे पाताळयंत्रीच करू शकतात, असाही उल्लेख जाधव यांनी पत्रात केला आहे.