Sushil Kedia statement: मुंबईतील व्यावसायिक सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देण्यात आलं होतं. तसेच काही वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया देत मराठी येत नसल्याचं सांगत आपण मराठी शिकणार नसल्याच्या संदर्भात केडिया यांनी विधान केलं होतं. एवढंच नाही तर राज ठाकरे व एक दहशतवादी यांच्या धोरणात काय फरक आहे? असा थेट सवाल सुशील केडिया यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे सुशील केडिया यांच्या विरोधात मनसेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

यानंतर सुशील केडिया यांचं कार्यालय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फोडल्याची माहिती देखील समोर आली होती. मात्र, यानंतर अखेर सुशील केडिया यांनी माफी मागितली आहे. ‘मी माझ्या चुकीबद्दल माफी मागतो’, असं म्हणत केडिया यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘राज ठाकरे यांच्याबद्दल मला नेहमीच आदर, कृतज्ञता वाटत आली आहे. मी माझी चूक मी स्विकारतो. तसेच मी आता अपेक्षा करतो की वातावरण शांत करावं, मी त्यांचा आभारी आहे’, असं केडिया यांनी म्हटलं आहे.

सुशील केडिया यांनी असंही म्हटलं की, “मी केलेलं ते ट्विट चुकीच्या मानसिक अवस्थेत व तणावात लिहिलं गेलं होतं. पण माझ्या त्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. काही लोकांना वाद निर्माण करत त्यामधून फायदा मिळवण्याचा होता. पण मराठी न कळणाऱ्या काही जणांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मी मानसिक तणावाखाली होतो. पण मला आता जाणवत आहे की मी माझी प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी”, असं सुशील केडिया म्हणाले आहेत.

सुशील केडिया काय म्हणाले होते?

सुशील केडिया यांनी एक पोस्ट शेअर केली होती आणि त्या पोस्टमध्ये राज ठाकरेंच्या मराठी भाषेच्या आग्रहावर टीका केली होती. मराठी शिकणार नाहीच, अशी भूमिका सुशील केडिया यांनी मांडली होती. “राज ठाकरे, याची नोंद घ्या की, मी मुंबईत गेल्या ३० वर्षांपासून राहतो. पण मला मराठी व्यवस्थित येत नाही. आता तुमचे यासंदर्भातले बेफाम गैरवर्तन पाहता मी हा पणच केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाचे कैवारी म्हणून वावरत आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोला”, असं केडियांनी म्हटलं होतं.

‘मला ६ भाषा येतात, पण मराठी चांगली येत नाही’

सुशील केडिया म्हटलं होतं की, “मला ५ भाषा माहिती आहेत. मराठीही माहिती आहे, पण ती व्यवस्थित येत नाही. हिंदी, बांगला, इंग्रदी, गुजराती आणि संस्कृत या पाच भाषा मला येतात. या भाषा मी लहानपणीच शिकल्या होत्या. मी सोशल मीडियावर यासाठी आज बोललो की तुम्ही लोकांना धमक्या देऊन काय सिद्ध करू इच्छिता? जीव घेणार आहात का? सांगा कुठे यायचं आहे? मारा मला. किती लोकांना मारणार तुम्ही?”, असा सवाल सुशील केडियांनी मनसेवर केला.

“तुम्ही अशी मारहाण करून दहशत पसरवत आहात. दहशतवाद्यांचा धर्म आहे. तो सांगतो की आमचाच धर्म अंतिम आहे, दुसरा कोणताही धर्म हा धर्म नाही. तुम्हीही तेच करत आहात. एक दहशतवादी आणि राज ठाकरेंच्या या धोरणात काय फरक आहे?” असं सुशील केडिया यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं होतं.