अहिल्यानगर : जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे १६३ कोटी रुपयांच्या दावा न केलेली ठेवी शिल्लक आहेत. या ठेवींचा ९ लाख ४ हजार २८१ खातेदारांना परतावा मिळविण्यासाठी १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा अग्रणी बँकेच्या (सेंट्रल बँक ऑफ इंडिया) सहकार्याने विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष नवले यांनी दिली.

देशभरात विविध बँकांमध्ये सुमारे १ लाख ३५ हजार कोटी रुपयांची दावा न केलेली ठेवी शिल्लक आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात ५ हजार ८६६ कोटी रुपये असून, त्यात वैयक्तिक खात्यांच्या ठेवी ४ हजार ६१२ कोटी, संस्थांच्या ठेवी १ हजार ८२ कोटी, आणि सरकारी योजनांमधील ठेवी १७२ कोटी रुपये समाविष्ट आहेत.जिल्ह्यातील काही बँकांमधील दावा न केलेल्या ठेवींची माहिती पुढीलप्रमाणे आहेत – एडीसीसी बँक: ७१ कोटी ५४ लक्ष (५.९९ लाख खाती), स्टेट बँक ऑफ इंडिया: ३० कोटी २८ लक्ष (०.७९ लाख खाती), सेंट्रल बँक ऑफ इंडिया: १३ कोटी ९५ लक्ष (६६ हजार खाती), युनियन बँक ऑफ इंडिया: १२ कोटी १५ लक्ष (४८ हजार खाती), बँक ऑफ महाराष्ट्र: ९ कोटी ८ लक्ष (२४ हजार खाती) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, १० वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी ‘ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी’मध्ये हस्तांतरित केल्या जातात. तथापि, खातेदारांना आपले पैसे परत मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे. ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे आणि अद्ययावत केवायसी सादर करणे आवश्यक आहे.

या मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे आणि ग्राहक भेटी आयोजित केल्या जातील. खातेदारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सर्व बँकांच्या वतीने करण्यात आले आहे.अनेक ठेवीदारांच्या रकमा बँकांमध्ये वर्षानुवर्ष पडून असतात. ठेवीदारांचे निधन, संबंधित खात्यांवर व्यवहार न होणे, नोकरदारांच्या बदल्यानंतर संबंधित बॅंकांच्या खात्यांकडे दुर्लक्ष होणे, आदी स्वरूपाची विविध कारणांनी खात्यातील निधी पडून असतो. दहा वर्षानंतर संबंधित खाते निष्क्रिय होऊन जाते व त्यानंतर ही रक्कम रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे हस्तांतरित केली जाते. रिझर्व बँकेने यापूर्वीही अशा प्रकारे दावा न केलेल्या खात्यातील रकमा परत देण्यासाठी मोहीम राबवली होती.