भाजप सरकारचे ‘अच्छे दिन’ कुठे गेले, असा सवाल करीत सत्ताधाऱ्यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी राज्यभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौका-चौकांमध्ये निदर्शने करावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना केले. येथील एस.व्ही. देशमुख मेमोरियल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.
या सरकारने ‘अच्छे दिन’ येतील, असा दावा केला होता. तो वर्षभरातच फोल ठरला आहे. या कार्यकाळात महागाई वाढली, भ्रष्टाचार फोफावला आहे. हे सरकार निवडक लोकांसाठीच काम करीत आहे. जनसामान्यांशी त्यांचे काहीही घेणे-देणे नाही. वर्षपूर्ती साजरी करणाऱ्या या सरकारची पुण्यतिथी आता आली आहे. यावेळी दुखवटा म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर निदर्शने करावी आणि सरकारची अकार्यक्षमता जनतेसमोर मांडावी, असे चव्हाण म्हणाले. एमआयएमसारख्या पक्षांना वाढवण्याचे काम भाजप करीत असून हिंदू आणि मुस्लिमांमधील दरी त्यांना वाढवायची आहे. अल्पसंख्याकांचे प्रश्न घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता समोर येऊन त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे, असे ते म्हणाले.
मोफत बियाणे द्या
राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. महिन्याकाठी ७० शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. ही अत्यंत गंभीर स्थिती आहे, त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून सरकारने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले पाहिजे आणि मोफत बी-बियाणे पुरवले पाहिजे, असे चव्हाण यांनी सांगितले.