सांगली : शतकाहून अधिक परंपरा असलेल्या अंबाबाई तालीम संस्थेच्या एबीजीआय शैक्षणिक संकुलाला स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे. आता या पुढे याचे रूपांतर अभिमत विद्यापीठामध्ये करण्याचे काम तरूण पिढीकडून होईल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

संस्थेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे आदींसह अनेक राजकीय, शैक्षणिक, माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अंबाबाई तालीम संस्था प्रामुख्याने शरीर संपदा बलवान होण्यासाठी स्थापन झाली असली तरी या सस्थेने ज्ञानदानाचे कार्यही सुरू केले. आज या संस्थेच्या माध्यमातून अभियांत्रिकी, व्यवस्थापन शास्त्र, परिचारिका, औषध निर्माण आणि शिक्षणशास्त्र हे अभ्यासक्रम चालविण्यात येत असून दोन हजाराहून अधिक विद्यार्थी विविध शाखांमधून ज्ञानार्जन करत आहेत. केवळ पुस्तकी ज्ञान न देता सदृढ शरीरसंपदाही लाभावी यासाठी संस्थेकडून जाणीवपूर्वक प्रयत्न तर केले जातात, पण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कामही या ठिकाणी होत आहे. संस्थेची प्रगती उत्तरोत्तर होतच राहील, पण लवकरच अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यात संस्था यशस्वी होईल असा विश्वास यावेळी मंत्री पाटील यानी व्यक्त केला.

यावेळी आमदार पडळकर यांनी शुभेच्छा देताना या संस्थेने सामान्य कुटुंबातील तरुणांना व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली असून याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगितले. दरम्यान, संस्थेमध्येही उपाध्यक्ष भोकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे नेते माजी स्थायी सभापती सुरेश आवटी, निरंजन व सीप आवटी, माजी नगरसेवक महंमद मणेर, डॉ. चंद्रकात पाटील, शिवाजी दव, इंद्रजित घाटे आदी उपस्थित होते. प्रारभी संस्थेचे संचालक डॉ. ए. सी. भगलों यांनी स्वागत केले, तर अध्यक्ष भाकरें यानी प्रास्ताविक केले.