सांगली : भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सम्राट महाडिक यांची, तर शहर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश ढंग यांची निवड मंगळवारी प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली. महाडिक यांची निवड होताच पेठ येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी मोठी चुरस या वेळी पाहण्यास मिळाली. शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक ढंग यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. या पदासाठी पृथ्वीराज पवार, ॲड. स्वाती शिंदे इच्छुक होते, तर विश्वजित पाटील यांच्या नावासाठी आ. सुधीर गाडगीळ प्रयत्नशील होते. अखेर ढंग यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी पलूस-कडेगाव मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख अणि मिलिंद कोरे यांच्यात चुरस होती. अखेरच्या क्षणी देशमुख यांच्याकडेच पद सोपविण्यात येईल, असे मानले जात असताना दोन्ही देशमुखांना दूर ठेवत पक्षाने वाळवा तालुक्यातील महाडिक यांना संधी दिली. विधानसभा निवडणुकीवेळी आ. सत्यजित देशमुख यांना उमेदवारी देत असताना महाडिक यांना चांगली संधी देण्याचा शब्द पक्षनेतृत्वाने दिला होता. विधान परिषदेची अपेक्षा असताना महाडिक यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकराज असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीचे रणशिंग लवकरच वाजले जाणार आहे. यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. मागील कालखंडात सांगली महापालिकेत भाजपची सत्ता होती. जिल्हा परिषद, अन्य नगरपालिकांमधील पक्षाची ताकदही वाढलेली दिसली. ही ताकद अजून वाढवत पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी नव्या जिल्हाध्याक्षांवर असणार आहे. सध्या जिल्ह्यातील अन्य पक्ष विशेषता विरोधी पक्षात मोठी मरगळ आहे, पक्ष आणि कार्यकर्ते विस्कळित आहेत. याचा फायदा घेण्यासाठी भाजपने संघटनात्मक पातळीवरही आक्रमक पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.