Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला. मात्र मराठा आरक्षणाच्या जीआरवर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर मराठा आरक्षणासंबंधीच्या जीआरमध्ये ओबीसी समाजाचे अजिबात नुकसान होणार नाही. जीआरमध्ये कुठेही सरसकट असा उल्लेख नाही. जीआर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही, असे मुख्यमंत्री फडणवील यांनी निक्षून सांगितले. मात्र, आता छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर करतो पण..
नाशिक येथे पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले की, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर करतो. त्यांचा हेतू चांगला असेल, त्यांचा अभ्यास आहे. पण ज्या पद्धतीने ड्राफ्टिंग झाले आहे. त्या बाबतीत आम्ही अभ्यासकांशी बोललो आहोत. ते बोलले हे अडचणीचे झालेले आहे. पहिल्या जीआरमध्ये मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र द्या, असा उल्लेख होता. जरांगे यांनी नंतर त्यांना सांगितले आणि पात्र हा शब्द काढला. यावरुन काय समजायचे? पुढे असे म्हटले की, नातेवाईक आणि नातेसबंध यात फरक आहे. नातेसंबंध म्हणजे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मराठा समाज मागास समाज नाही
भुजबळ म्हणाले काही आयोगाने मराठा समाजाला असे प्रमाणपत्र देता येणार नाही, असे म्हटले आहे. न्यायालयाचे निरीक्षण आहे की, मराठा समाज मागास समाज नाही, हा पुढारलेला समाज आहे. मराठा म्हणून काय किंवा कुणबी मराठा म्हणून देखील ते यात येऊ शकत नाहीत. तीन आयोगांनी हे फेटाळले हे १९५५ पासून सांगितले आहे. मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. काही केंद्रात गेले पण त्यांनी केले नाही. बॅकवर्ड क्लासचे सर्टिफिकेट खोट्या पद्धतीने मिळविले जातात, हे दुर्दैव आहे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी कोर्टाचे निरीक्षण वाचून दाखवलं.
देशात अजून जरांगेशाही नाही-भुजबळ
मनोज जरांगे यांच्या टिकेला भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले. देशात लोकशाही आहे. जरांगेशाही अजून यायची आहे. ती अजिबात येणे शक्य नाही. शेजारील देशात गडबड होत आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान इतके मजबूत आहे की त्यांनी अनेक राज्य, अनेक भाषा, अनेक धर्मांना एकत्रित बांधून लोकशाही जपली आहे. देशात जरांगेशाही येण्याची सुतराम शक्यता नसल्याचा टोला त्यांनी लगावला.