अलिबाग : शिवाजी महाराजांचे तीनशे गडकिल्ले त्यांची जिवंत स्मारके आहेत. त्यांच्या दगडा-दगडात इतिहास आहे. या गडाचे संवर्धन राज्य सरकार कधी करणार, असा सवाल छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारला केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. शासनाला त्यांचे संवर्धन करणे शक्य नसेल, तर ५० किल्ले आमच्या ताब्यात द्या! आम्ही शासनाचा एकही रुपया न घेता गडकिल्ल्यांचे संवर्धन करून दाखवतो, असे आव्हान त्यांनी दिले. ते तारखेनुसार ३५० व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळय़ात बोलत होते.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रायगड प्रधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचे कौतुक केले आहे. गडाच्या पायथ्याशी संपादित जागेवर शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर प्रतापगड संवर्धनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक चांगली बाब आहे. पण त्याच वेळी शिवाजी महाराजांच्या ३०० गडकिल्ल्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाकडे गेली १० वर्षे पाठपुरावा सुरू आहे. पण त्याकडे राज्य सरकारने लक्ष दिलेले नाही. तिनशे नको पण ५० किल्ले आमच्या ताब्यात द्या, आम्ही विकास करून दाखवतो, असेही ते म्हणाले.

रायगडावर शिवभक्तांचा उत्साह

सोमवारी सायंकाळी शिरकाई पूजन आणि गड पूजनाने शिवराज्याभिषेक दिन सोहळय़ास सुरुवात झाली. रात्री राज्यभरातून आलेल्या शाहिरांनी शिवमहिमा सांगणारे पोवाडे सादर केले. चाळीस पथकांनी गडावर मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. मंगळवारी सकाळी ध्वजारोहणाने शिवराज्याभिषेक सोहळय़ाची सुरुवात झाली. वेदमंत्रोच्चाराच्या गजरात शिवाजी महाराजांच्या पुतळय़ावर शिवराज्याभिषेक करण्यात आला. यावेळी ३५० सुवर्ण होनांचा अभिषेक करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळा पार पडला. राजसदरेपासून सुरू झालेल्या पालखी सोहळय़ाचा समारोप जगदीश्वर मंदिरात झाला. महाप्रसादाने सोहळय़ाची सांगता झाली. अवघा रायगड शिवभक्तांच्या उत्साहाने दुमदुमून गेला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati sambhaji raje talk about conservation of forts on shivrajyabhishek day zws
First published on: 07-06-2023 at 06:32 IST