बीड – सलग दुसऱ्या दिवशीही सुरू असलेल्या पावसाने बीड जिल्ह्यात थैमान घातले असून पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश जनजीवन विस्कळीत झाले. आष्टी येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी नाशिक येथून लष्कराला प्राचारण करावे लागले. त्यांनी ११ जणांना सुरक्षित बाहेर काढले. अंबाजोगाई मध्ये पाझर तलाव फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गोदावरीची पाणीपातळी वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले.
आष्टी तालुक्यातील तालुक्यातील सर्व महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला.दौलावडगाव,धामणगाव,धानोरा प्रामुख्याने जिल्हा परिषद गटात ढगफुटी झाल्याने सर्व प्रकल्प,नदया तुडूंब भरून वाहत आहेत.कडा येथे नदी पात्रा शेजारी सापते कुटुंबातील अकरा जण अडकले होते. शेरी खुर्द येथील काही जण पुरात अडकले होते. त्यांना तातडीने बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून हेलिकॉप्टर बोलवावे लागले. नाशिक येथील राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने आष्टी तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना बचाव कार्य करत सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आमदार सुरेश धस यांनी स्वतः पूरस्थितीकडे लक्ष ठेवून होते.
अंबाजोगाई तालुक्यात राक्षसवाडी साठवण तलाव फुटल्याने शेतीचे नुकसाना झाले आहे.बोधेगाव, कावळेवाडी, वाघाळा, भिलेगाव, मलनाथपूर, परचुंडी, सेलू, पिंपळगाव (गा), कौडगाव साबळा, कौडगाव येथील सर्वच नद्या ओसंडून वाहत असल्याने सोनपेठ – घोडा कवडगाव येथून परळीला जाणारा मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने काही वेळ वाहतूक ठप्प होती. गोदावरीला पूर आल्याने परळी तालुक्यातील पोहनेर गावचा संपर्क रात्रीपासून तुटलेला होता. माजलगाव तालुक्यातही पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.
बीड – धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि धरणात होत असलेली पाण्याची आवक पाहता माजलगाव धरणातून सिंदफणा नदीपात्रात ५६ हजाराहून अधिक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे.तर केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणातून नदीपात्रात १७३३३ प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे.यामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.