अहिल्यानगर : चोरीच्या संशयावरून ग्रामस्थांनी मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सुपा (ता. पारनेर) पोलीस ठाण्यात घडली. संशयित तरुणाचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याने या घटनेची राज्य गुन्हा अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्यासाठी वरिष्ठांना कळवणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

बालाजी रतन राठोड (वय ३२, रा. पांगरी बुद्रुक, ता. मंठा, जालना असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पार्थिवाची तपासणी आज बुधवारी सायंकाळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या उपस्थितीत केली जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले. यासंदर्भात सुपा पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार बाळासाहेब मासळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुपा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरू करण्यात आली आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास सुपा पोलिसांना सुपा (नगर-पुणे रस्ता) टोलनाक्याजवळ एक पिकअप वाहन पकडण्यात आले. एक चोर पकडला आहे, बाकीचे पळून गेले, पोलीस पाठवा, असा फोन आला. त्यानुसार सहायक उपनिरीक्षक जब्बार पठाण, हवालदार प्रशांत दिवटे घटनास्थळी गेले. सुपा टोलनाक्यावर काहीजणांनी या संशयीत तरुणाला मारहाण केली होती. लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिथेही लोक जमा झाले होते.

पोलिसांनी त्याला दवाखान्यात जायचे आहे का, असे विचारले. मात्र, त्याने दवाखान्यात जायचे नाही, मला बाहेर सोडू नका, लोक मारतील, असे सांगितले. त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यातच बसवून ठेवण्यात आले. आज, बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास बालाजी राठोडला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला सुपा येथील खासगी रुग्णालयात, रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले. रुग्णालयात तपासणी सुरू असताना डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या तरुणाला मारहाण होत असल्याची घटना सुपा टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.