पंढरपूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आता थकले असून, त्यांना अस्तित्व टिकवायचे असेल, तर एकत्र यावे लागेल हे सुशीलकुमार शिंदे यांचे विधान हे वास्तवाचे भान असल्याचे प्रतीक असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही काँग्रेसची स्पर्धा आता विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी सुरू असल्याचा टोला लगावला.
पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची आज मंगळवेढा येथे जाहीर सभा पार पडली. या वेळी त्यांनी वरील टीका केली.
या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, विजयसिंह मोहिते पाटील, कल्याण काळे, राहुल शहा, शिवसेनेचे शिवाजी सावंत, आ. प्रशांत परिचारक आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुशीलकुमार शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केलेल्या विधानाचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले, की सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे द्रष्टे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेले मत हे खरेच असणार. त्यांना दोन्ही काँग्रेसच्या सद्य:स्थितीची नेमकी जाणीव असल्यामुळे त्यातूनच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या थकलेल्या अवस्थेबद्दल भाष्य केलेले असावे. आपण जर एकत्र आलो नाही, तर निवडणुकीनंतर आपल्या पक्षाला विरोधीपक्षनेतेपद देखील मिळणार नाही. या जाणिवेतूनच त्यांनी अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही काँग्रेसने एकत्र येण्याची इच्छा बोलून दाखवली असणार, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी या सभेत काढला. आज त्यांनी दोन्ही काँग्रेसच्या वास्तवाचे दर्शन घडवले तर त्यांच्यावरच टीका सुरू झाल्याची खंतही मुख्यमंत्र्यांनी या वेळी बोलून दाखवली.
गेल्या पाच वर्षांत सरकारने केलेल्या कामांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, की रस्ते, वीज,पाण्याचा प्रश्न, जलयुक्त शिवार, शेततळे आदी प्रत्येक क्षेत्रात सरकारने मूलभूत काम केले आहे. सातारा, सांगली आणि सोलापुरातील काही भाग हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. दोन्ही काँग्रेसने वर्षांनुवर्षे केलेल्या उपेक्षेच्या आणि भ्रष्टाचारी वर्तनामुळे या भागाला ही ओळख मिळाली आहे. त्यांनी केलेली ही उपेक्षा या भागातील जनता कदापि विसरणार नाही. जागतिक बँकेच्या मदतीने या भागाची ही ओळख आम्ही पुसून टाकणार आहोत. लवकरच बंद जलवाहिनीतून पाणी आणण्याचे काम हाती घेतले आहे. पुन्हा सत्तेवर येताच मंगळवेढा, सांगोला,जत, आटपाडी, माण, खटाव या तालुक्यातील दुष्काळ आता कायमचा संपणार असून त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
विरोधी पक्षाच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवताना मुख्यमंत्री म्हणाले, की सत्तेत येण्याची अजिबात शक्यता नसणाऱ्या या काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आता केवळ प्रत्येकाला एक ताजमहाल बांधून देतो एवढेच आश्वासन देण्याचे बाकी आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून सुधाकरपंत परिचारक यांच्यासारखा देव माणूस उमेदवार म्हणून दिला आहे. सभेला जमलेली गर्दी पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आमदार प्रशांत परिचारक यांनी गेल्या पाच वर्षांत मतदार संघातील विकास कामाची माहिती दिली.