काँग्रेसची नामी हुकमत असलेल्या कराड दक्षिणमधून विधानसभेची निवडणूक जिंकण्याचे मनसुबे बाळगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट मतदारांशी संवाद साधत आणि स्थानिक नेत्यांना आपलेसे करत मोर्चेबांधणीला गती दिली आहे. मुख्यमंत्री आज दोन दिवसांच्या कराड दौऱ्यावर आले असून, त्यांनी शहरालगतच्या विद्यानगर येथे सैदापूर पंचक्रोशीतील नागरिकांशी विविध विकासकामे व समस्यांसंदर्भात चर्चा केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस खात्याच्या गृहसंकुलाचे तसेच जिजाऊ या शासकीय विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन समारंभपूर्वक पार पडले.
जनता दरबाराच्या प्रारंभी स्लाइडशोद्वारे परिसरातील विविध समस्या व त्यांचे गांभीर्य चव्हाण यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यात सैदापूर गावठाणातील १९ किलोमीटरच्या आंतर्गत रस्त्यांची झालेली चाळण, सांडपाण्याची समस्या, बारमाही २४ तास नळपाणी योजनेचे रखडलेले काम, वाचनालयाची अनास्था, गोवारे ते खोडशी कॅनॉललगतच्या रस्त्याची दुरवस्था, महादेव व वाळकेश्वर मंदिराची डागडुजी असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या योजना व कायद्याच्या चौकटीत आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. सैदापूरच्या भुयारी गटार योजनेस यापूर्वीच मंजुरी असून, रखडलेल्या २४ तास नळपाणी योजनेच्या कामास गती देण्यात येईल. अंतर्गत रस्ते, खोडशी ते गोवारे मार्ग सुसज्ज होण्यासाठी निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. १९९१ मध्ये खऱ्या अर्थाने आपल्या राजकीय कारकीर्दीस प्रारंभ झाला. तेव्हापासून येथील जनतेने आपल्याला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिले. त्यातून उतराई होण्यात कुठे कमी पडणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी सादर झालेल्या निवेदनांनी अर्धा डझन फाइल्स फुल्ल झाल्या होत्या. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार आनंदराव पाटील यांची उपस्थिती होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी उशिरा स्थानिक स्वराज्यसंस्थांचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलवली असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांनी गाटीभेटी अन् बैठकांचा झपाटा लावल्याने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2014 रोजी प्रकाशित
मुख्यमंत्र्यांची कराड दक्षिणेत मोर्चेबांधणीची लगबग
काँग्रेसची नामी हुकमत असलेल्या कराड दक्षिणमधून विधानसभेची निवडणूक जिंकण्याचे मनसुबे बाळगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट मतदारांशी संवाद साधत आणि स्थानिक नेत्यांना आपलेसे करत मोर्चेबांधणीला गती दिली आहे.

First published on: 20-07-2014 at 02:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm prithviraj chavan ready for election in karad