कराड : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी राज्यातील ग्रामपंचायतींनी कंबर कसली आहे. एकाच दिवशी सुमारे अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. मात्र, पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने विविध वेशभूषा आणि चारचाकी मोटारगाडीवर संपूर्ण अभियानाची माहिती साकारून वेगळ्या पद्धतीने या अभियानाचा प्रारंभ केला. अभियानातील मुद्द्यानुसार मानवी वेशभूषा आणि अभियानाची चित्रबद्ध गाडी सर्वदूर आकर्षण ठरली आहे.
ग्रामसभांचा आदर्श पॅटर्न म्हणून पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीची सर्वत्र ओळख आहे. या गावाने ग्रामसभा बळकट करत पंचवीस वर्षांत लोकसहभागाची चळवळ उभी केली आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमांत नेहमीच एक पाऊल पुढे असलेल्या मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने नुकतीच ग्रामसभेतून अभियानातील सात मुद्द्यांवर ग्रामस्थांमध्ये जागृती आणि प्रबोधन केले आहे. मात्र, हे अभियान लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक मुद्द्याची मानवी वेशभूषा करण्यात आली होती. तसेच येथील सरपंचांनी स्वतःच्या चारचाकी मोटारगाडीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान चित्रबद्ध करून, गावातून फेरी काढली. अभियानाची पार्श्वभूमी नागरिकांना समजण्यासाठी शासन आदेश आणि त्यातील सर्व मुद्दे या गाडीवर चित्रबद्ध केले होते. गाडीचे वाचण केल्यानंतर संपूर्ण अभियान समजण्यासाठी मदत झाली.
यावेळी पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी ग्रामसभेत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानमध्ये मान्याचीवाडी निश्चितच आदर्शवत कामगिरी करेल असा विश्वासही तहसीलदार अनंत गुरव यांनी व्यक्त केला आहे. यावेळी सरपंच रवींद्र माने, सदस्य दिलीप गुंजाळकर, लता आसळकर, निर्मला पाचुपते, मनीषा माने, सीमा माने, ग्रामपंचायत अधिकारी अनिल चव्हाण, पोलीस पाटील विकास माने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादासाहेब माने, अधिकराव माने, विठ्ठल माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामसभेचा मान्याचीवाडी पॅटर्न…
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यातील पहिली बायोमेट्रिक उपस्थितीद्वारे ग्रामसभा घेऊन आदर्श घालून दिला होता. यापूर्वी केंद्र सरकारने दोनवेळा गौरव ग्रामसभा पुरस्काराने या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेशभूषा आणि चित्रबद्ध गाडीचा प्रयोग केला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतीचा प्रवास सुरू असून ग्रामविकासातील नाविण्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी सरीता पवार यांचे मार्गदर्शन लाभते, असे या वेळी सरपंच रवींद्र माने यांनी सांगितले.