पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा देत २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. मोदी यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमधील तरतूदी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्या. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणावर काँग्रसेनं टीका केली असून, आत्मनिर्भरतेचा अर्थ सांगत मोदी सरकारला टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील योजनांची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी केली. त्यात स्थलांतरित मजुरांसह विविध घटकांवर लक्ष केंद्रित करत सीतारामन यांनी नऊ योजनांची माहिती दिली. गेल्या काही दिवसांमध्ये स्थलांतरित मजुरांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जथे रस्त्यांवरून पायपीट करत आहेत. या मजुरांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार काम करत असल्याचे सीतारामन सांगितलं.

सीतारामन यांनी दोन पत्रकार परिषदांमध्ये केलेल्या घोषणांवर काँग्रेसनं टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट करून सरकारवर टीका केली आहे. “निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेचं सार, जगायचं असेल, तर आणखी कर्ज घ्या. आत्मनिर्भरतेचा अर्थ समजला का?,” अशी टीका सावंत यांनी केली आहे.

धान्य वाटप करण्यासाठी केंद्राकडून झालेल्या दिरंगाईवरही सचिन सावंत यांनी टीका केली होती. “महाविकास आघाडी सरकारनं जनतेला वाटून उरलेले धान्य माफक दरात स्थलांतरित मजुरांना देण्याकरिता केंद्राकडे विनंती केली. पण केंद्रानं परवानगी दिली नाही. २ महिने या गरिबांची दैन्यावस्था केल्यानंतर व बहुसंख्य आपल्या गावी परतल्यानंतर फुकट धान्याची घोषणा झाली आहे. असंवेदशीलता याला म्हणतात,” असं म्हणत सावंत यांनी केंद्राच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.