सांगली : राज्यसभा निवडणुकीचा अनुभव ताजा असल्याने विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी डोळे मिटून गप्प बसणार नाही. सुधारणा करून विधान परिषदेत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी केले. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जे करायचं आहे ते रणांगण आल्यावरच करायचं ही माझी सवय आहे, असं मत काँग्रेसचे नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केलं आहे. भाजपाचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांच्या राज्यसभा निवडणुकीतील विजयावर त्यांनी पहिल्यादाच प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका अजून लांब आहेत. ज्यावेळी प्रत्यक्ष लढाई असते, तेंव्हा आम्ही निवडणूकीत कसं उतरतो, हे सगळ्यांनाच माहीत आहे.

कोल्हापुरचा विकास करणं आणि कोल्हापुरला पुढे घेऊन जाणं, हे आमचं ठरलंय असंही पाटील म्हणाले. सांगली शहरातील झुलेलाल चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या नामफलकाचे अनावरण सतेज पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा – PM Modi Pune Visit : भाषण करण्यापासून अजित पवारांना डावललं? देहू संस्थानच्या अध्यक्षांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

माध्यमांशी बोलताना पाटील पुढे म्हणाले, राज्यसभेच्या अनुभवातून आम्ही अनेक गोष्टी शिकलोय, विधान परिषदेमध्ये कुठेही दगाफटका होणार नाही. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सगळे आमदार आमच्यासोबत राहतील, असा मला विश्वास आहे. राज्यसभा निवडणुकीत अनावधानाने काही गोष्टी घडल्या आहेत. पण त्याची पुनरावृत्ती विधानपरिषदेत होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader satej patil on vidhan parishad election and dhananjay mahadik victory in rajyasabha election rmm