लातूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं  आघाडीचे उमेदवार दत्तात्रय बनसोडे लक्षवेधी मतांनी निवडून येतील, असा विश्वास आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत देशमुख बोलत होते. आमदार वैजनाथ िशदे, अॅड. त्र्यंबकदास झंवर, अॅड. व्यंकट बेद्रे, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, धीरज देशमुख, अॅड. समद पटेल, कनिष्क कांबळे आदी उपस्थित होते. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतरची ही पहिली लोकसभा निवडणूक आहे. विलासराव आपल्यात आहेत असे समजून कार्यकत्रे कामाला लागले आहेत. त्यांचे विचार, पक्षनिष्ठा, कामाचा उत्साह याची आठवण ठेवून सर्वजण काम करीत आहेत. जिल्हय़ातील सर्व कार्यकत्रे सामूहिक नेतृत्व उभे करून ही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे काँग्रेस उमेदवार लक्षवेधी मतांनी निवडून येतील, असे देशमुख म्हणाले. खासदार जयवंत आवळे प्रचारास येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील निवडणुकीत लोहा व कंधार तालुक्यांत काँग्रेसला कमी मते मिळाली. या वेळी या दोन्ही तालुक्यांत काँग्रेसला मताधिक्य मिळेल, असा दावा त्यांनी केला.
बनसोडे यांनी आपण सामान्य कुटुंबातील आहोत. त्यामुळे सामान्यांच्या समस्या जाणतो. उच्च विद्याविभूषित असल्यामुळे लोकसभेत िहदी, इंग्रजी भाषांतून आपले प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडेन, असे म्हटले. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, या साठी आपण पुढाकार घेतला. सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी कायम शेतकऱ्यांच्या बाजूने राहू. प्रसंगी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांची बाजू मांडण्यास कुचराई करणार नाही, असे सांगितले.