महाराष्ट्रात करोनानं थैमान घातलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर विषाणूंचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान आहे. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांनी काही निर्णयही घेतले आहेत. पण भाजपा नेते निरंजन डावखरे यांनी उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करताना महाराष्ट्राला सध्या अनुभवी देवेंद्र फडणवीसांची गरज आहे असं म्हटलं आहे. निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता.

निरंजन डावखरे यांनी काय म्हटलं ?
निरंजन डावखरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की “सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे”.

आणखी वाचा- Coronavirus: “तुमचं राजकारण होम क्वारंटाईन करा”, रोहित पवारांनी भाजपा नेत्याला सुनावलं

निरंजन डावखरेंच्या या ट्विटरला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. रोहित पवारांनी समाचार घेत खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, “राजकारण आम्हालाही करता येतं, पण आज ती वेळ नाहीय. संकटाच्या काळात तरी तुमचं राजकारण ‘होम क्वारंटाईन’ करा. तुमचा एवढा ‘अभ्यास’ व अनुभव असेल तर मदत करायला तुम्हाला अडवलं कुणी?”.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनीही निरंजन डावखरेंना उत्तर दिलं आहे. “असल्या राजकारण्यांना पहिले क्वारंटाईन केले पाहिजे. तुमच्या नेत्यांना वुहान, स्पेन किंवा इटली मध्ये घेऊन जा. तसेही जगातला सर्वात मोठा पक्ष आहे तुमचा,” असं ते म्हणाले होते.