भ्रष्टाचार, अन्नधान्याच्या वाढत्या किमती, बेरोजगारी आणि दिल्लीत घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा फटका नुकत्याच पार पडलेल्या चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बसल्याची स्पष्ट कबुली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली, परंतु राज्याच्या विपरित केंद्राच्या निवडणुका असतात. त्यामुळे पुढील निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे सरकारच सत्तेत येईल, अशी आशा व्यक्त करून नवी दिल्लीत आम आदमी पक्षाला मिळालेले यश नवीन राजकारणाची चाहूल देणारी घटना असल्याचे मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
 येथील सेमिनरी हिल्सवरील एस.एफ.एस. महाविद्यालयाच्या चार्लस् सभागृहात ‘महाविद्यालयीन युवकांशी संवाद’ या उपक्रमात पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ातील सुमारे तीस महाविद्यालयांतील पाचशे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. सध्या देशात भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी व महिलांवरील अत्याचार वाढत असल्याने लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे पुढील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेस विजयी होईल काय, असा प्रश्न हर्षल गजेश्वर याने विचारल्यावर ते म्हणाले, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा अपवाद सोडला तर प्रत्येक निवडणुकीनंतर केंद्रात व राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार येत असल्याचे दिसून येते. सध्या भ्रष्टाचाराची काही प्रकरणे समोर आली आहेत. त्याचा परिणाम सत्ताधारी पक्षाला भोगावा लागत आहे, तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महागाई, बेरोजगारी व दिल्लीतील बलात्काराच्या प्रकरणाचा परिणाम दिसून आला, परंतु युपीए सरकारच्या काळात देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. या सरकारने रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या पाच राज्यात जे घडले ते पुढील निवडणुकीत होईलच, असे नाही.
तरुण मतदारांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक पक्षांना संधी आहे. एकाही राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर असुरक्षितता निर्माण होते. राजकारणात भाग घेणे म्हणजे निवडणूक लढवणे नव्हे. त्यासाठी राजकीय प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक असल्याचे देवेंद्र झाडे याने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. तरुणींवरील अत्याच्यारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यासाठी आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय, असे पायल काळबांडे हिने विचारल्यावर ते म्हणाले, हा प्रश्न अत्यंत गंभीर आणि चिंतेचाही आहे. राज्य सरकार कडक कायदे करत आहेत. विशेषत महिला पोलिसांची संख्या वाढवून अशा प्रकरणांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समाजानेच महिलांच्या बाबतीतील आपली भूमिका बदलणे आवश्यक आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये समानता निर्माण करण्याची गरज आहे. अन्यायग्रस्त महिलांसाठी आर्थिक संधी उपलब्ध करून दिली जात आहे.  भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांना पुढे आणले असताना काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर का केला नाही, या अनंत कुमार याने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात, काँग्रेस योग्य वेळी योग्य निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले, परंतु नरेंद्र मोदी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, राम मंदिर, कलम ३७० वर काय करणार, हे आधी स्पष्ट करावे, असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी आम आदमी पक्षाला काँग्रेस पाठिंबा देण्यास तयार असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
प्रत्यक्ष विरोध करणे आणि सत्तेत सहभागी होऊन सत्ता चालवणे, या दोन्ही भिन्न बाबी आहेत. आम आदमी पक्षाने सत्तेत सहभागी होऊन नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, असेही ते म्हणाले. याशिवाय, अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ, मिहान, ऑटोमोबाईल क्षेत्र, शैक्षणिक समस्या, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, गरिबी, नागपूर विद्यापीठातील समस्या, विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे धोरण, खासगी क्षेत्रातील आरक्षण, विदर्भाचे पर्यटन धोरण या विषयांवरील प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिलीत. यावेळी शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेले महाराष्ट्राच्या विकासाचे प्रारूप असलेले छायाचित्र मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात आले. यावेळी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, विभागीय आयुक्त व्ही. गोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी सौरभ राव प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी आभार मानले.