भारतात पुन्हा एकदा करोनाने डोकं वर काढल्याचं चित्र दिसून येतं आहे. सध्याच्या घडीला करोनाचे NB.1.8.1 आणि LF.7 हे दोन व्हेरिएंट दिसून येत आहेत. WHO ने याबाबत माहिती दिली आहे. २६ मे रोजी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या पत्रकानुसार सुमारे १ हजाराहून जास्त सक्रिय रुग्ण देशभरात आहेत. करोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. आता पुन्हा एकदा करोना
केरळमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण
केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार केरळमध्ये करोनाचे सर्वाधिक रुगण आहेत. भारतात सध्या १००९ रुग्ण करोनाशी लढा देत आहेत. त्यापैकी ४३० रुग्ण हे एकट्या केरळमध्ये आहेत. करोनाचा केरळला सर्वाधिक फटका बसल्याचं सध्याच्या आकडेवारीनुसार तरी दिसून येतं आहे. करोना झालेल्या रुग्णांना गृह विलिगीकरणात ठेवण्यात आलं आहे अशी माहिती केरळ प्रशासनाने दिली आहे. तर केरळमध्ये आत्तापर्यंत करोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचंही वृत्त आहे.
महाराष्ट्रात २०० हून अधिक रुग्ण आणि चार मृत्यू
केरळनंतर महाराष्ट्रात करोनाचे २०९ सक्रिय रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत चार रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत करोनाचे ३५ रुग्ण आहेत. त्यामुळे आज आलेल्या अहवालानंतर महारष्ट्रात २४० करोना रुग्णांची नोंद झाली आहे. जे चार मृत्यू राज्यात झाले आहेत त्यांना आधी मधुमेह, उच्च रक्तदाब या व्याधी होत्या असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.दरम्यान हैदराबाद आणि बंगळुरु या शहरांमध्येही करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.
दिल्लीत करोनाचे १०४ रुग्ण
महाराष्ट्रानंतर दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. १०४ जणांना करोना झाला आहे. सध्या या रुग्णांवर गृह विलीगीकरणातच उपचार सुरु आहेत. कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही करोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र त्यांचं प्रमाण केरळ, महाराष्ट्र आणि दिल्लीच्या तुलनेत कमी आहे.