सातारा : रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या श्री रोकडेश्वर महाराजांची यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वैभव यांचा सुंदर संगम या यात्रेत अनुभवायला मिळाला. बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत पंचक्रोशीतील सर्वच भाविकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. सालाबादप्रमाणे यावर्षीही कोजागिरी पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते. यात्रा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे श्री रोकडेश्वर महाराजांचा महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर यथोचित पूजा व आरती होऊन श्रींच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

यात्रेतील छबिना सोहळा हा नेहमीप्रमाणेच मुख्य आकर्षण ठरला. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम-झांज पथकांच्या तालावर आणि गुलालाच्या उधळणीत छबिना निघाला. “जय रोकडेश्वर महाराज की जय” या घोषणांनी संपूर्ण रहिमतपूर परिसर दुमदुमून गेला. रात्रभर चालणाऱ्या या छबिना मिरवणुकीत भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला. पहाटे श्रींच्या हारांचा लिलाव पार पडला, तर गावभर भजनी मंडळ, झांज पथके, सांस्कृतिक व संगीत कार्यक्रमांची मेजवानी रंगली होती.

यात्रेत भारुड, कीर्तन, पारंपरिक वाद्य व नृत्य सादरीकरण, तसेच शिवकालीन शस्त्रप्रदर्शन व मोठमोठे झोपाळे यामुळे भाविकांचा उत्साह अधिकच वाढला. या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परंपरांचा वारसा जपला जात असल्याचे स्पष्ट दिसून आले. भाविकांच्या महासागरात शिस्त राखण्यासाठी रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा समितीने उत्कृष्ट बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण यात्रा शांततेत आणि आनंदात पार पडली.