उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या भाषणात केलेल्या वक्तव्याची चर्चा चांगलीच रंगताना दिसते आहे. खरंतर अजित पवार हे मुलींच्या जन्मदराबाबत बोलत होते. मात्र त्यांनी द्रौपदीचं उदाहरण दिलं. त्यांना आपण काय बोलून गेलो हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने हात जोडत मी विनोद केला गांभीर्याने घेऊ नका असंही सांगितलं. मात्र त्यांच्या या वक्तव्याची चर्चा मात्र सुरु झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले अजित पवार?

“आम्ही मधल्या काळात पाहिलं, मुला-मुलींच्या जन्मदरात महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये इतकी तफावत होती की १ हजार मुलं जन्माला आल्यानंतर ८०० ते ८५० मुली जन्माला येत होत्या. काही वेळा हा जन्मदर ७९० इतकाही कमी झाला होता. मी म्हटलं की पुढे द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय?, असा प्रसंग त्यावेळेस येईल.” अजित पवारांनी हे वाक्य उच्चारलं आणि तातडीने म्हणाले, “यातला गंमतीचा भाग सोडून द्या, नाहीतर लगेच म्हणतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला, मला कुणाचाही अपमान करायचा नाही.” तसंच त्यांनी हातही जोडले. अजित पवार यांनी जरी हात जोडून वेळ मारुन नेली असली तरीही हे वाक्य चर्चेत आलं आहे. इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्य मेळाव्यात बोलत असताना अजित पवारांनी हे वाक्य उच्चारलं आहे.

द्रौपदी महाभारतातली एक तेजस्वी स्त्री आणि राणी होती. तिचे पाच पती होते. त्याची कारणं वेगळी होती. महाभारतातलं एक महत्वाचं पात्र म्हणून द्रौपदीकडे पाहिलं जातं. मात्र अजित पवारांनी मुलींच्या जन्मदरावर भाष्य करत असताना ‘द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय?’ हे म्हटल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांनी महिला वर्गाचा अपमान केला आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

हे पण वाचा- महायुतीचं सरकार टिकणार नाही? अजित पवार गटातील आमदाराच्या वक्तव्याने खळबळ; भाजपा नेत्याला म्हणाले, “मी सुरूंग लावून…”

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

“अजित पवारांच्या डोक्यात जे विष होतं ते बाहेर आलं आहे. ज्या काकांनी स्त्रियांना ५० टक्के आरक्षण देऊन महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला, महिलांना मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांनी कर्मकांडाला विरोध केला होता. महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना न्याय दिला त्यांच्याच महाराष्ट्रात एक माणूस स्त्रिया द्रौपदी झाल्या असत्या असं म्हणतात. द्रौपदीचा अर्थ काय होतो? त्यांनी जरा समजवून सांगावं आणि समस्त महिला वर्गाची माफी मागावी” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm ajit pawar controversial statement about mahabharat draupadi in speech while talking on female birth ratio scj